नवी दिल्ली, दि. 07 - दुसऱ्या सामन्यात अखिलाडूवृत्तीमुळे एका कसोटी सामन्याची बंदी झालेला अष्टपैलू रवींद्र जडेजानं ट्विटवर डायलॉगबाजी करत खंत व्यक्त केली आहे.
शाहरुख-काजोलच्या दिलवाले या चित्रपटातील 'हम शरीफ क्या हुए सारी दुनिया ही बदमाश हो गई' हा जबरा डायलॉग त्यानं आज ट्विटरवर पोस्ट केला आहे. या डायलॉगसोबत त्यानं कोणतेही कॅप्शन लिहिलेलं नाही. मात्र त्याने अप्रत्यक्षपणे निलंबनावर नाराजी व्यक्त केल्याचे नेटीझन्स म्हणत आहेत.
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रवींद्र जडेजावर अखिलाडूवृत्तीसाठी आयसीसीनं एका सामन्याची बंदी घातली आहे.
कोलंबो कसोटीत जाडेजाने स्वत:च्या गोलंदाजीवर अडवलेला चेंडू फलंदाज करुणारत्नेच्या दिशेने अतिशय धोकादायक पद्धतीनं थ्रो केला होता. या प्रकरणात आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे जाडेजाला तीन दंड गुण आणि कसोटी मानधनाच्या 50 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. पण गेल्या 24 महिन्यांत जाडेजाच्या बेशिस्त वर्तनासाठीच्या एकूण दंड गुणांची संख्या सहावर गेली. त्यामुळे आयसीसीच्या नियमावलीनुसार त्याच्यावर एका कसोटीतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दुसऱ्या कसोटीत भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि53 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या मालिकेत भारताकडून पहिल्या डावात अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांनी शतकी खेळी केल्या. तर गोलंदाजीत रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात तर रवींद्र जाडेजाने दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी केली. श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात गडगडला, मात्र दुसऱ्या डावात दिमुथ करुणरत्ने आणि कुशल मेंडीसच्या शतकी खेळीच्या जोरावर लंकेने भारताचा काही प्रमाणात नेटाने सामना केला. मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने श्रीलंकेला डावाचा पराभव सहन करावा लागला.
Web Title: Jadeja jabra dialogue on one match ban
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.