राजकोट : शानदार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि अद्भूत फलंदाज पृथ्वी शॉ यांच्यात सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असल्याचे प्रशंसोद्गार भारतीय कर्णधार विराट कोहली याने वेस्ट इंडिजवरील कसोटी विजयानंतर काढले.
कोहलीने या दोघांची पाठ थोपटली शिवाय पृथ्वीच्या अद्भूत क्षमतेचे कौतुक केले. तो म्हणाला,‘पृथ्वीमधील अपार क्षमतेमुळे कसोटी संघात त्याला स्थान देण्यात आले. जडेजाने तर आधीही संघासाठी धावा केल्या आहेत. त्याला शतक साजरे करताना पाहू इच्छित होतो. जडेजामध्ये तर सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता आहे.’
प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्याचे श्रेय कोहलीने मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना दिले. तो म्हणाला, ‘शमी अािण उमेश यांनी वेगवान माऱ्यामुळे पाहुण्यांना सुरुवातीला अडचणीत आणले.’ षटकांच्या गतीबद्दल विचाराले असता कोहली म्हणाला, ‘यासाठी खेळाडूंपेक्षा पंच जबाबदार आहेत. ड्रिंक्सच्या नव्या नियमामुळे त्रास झाला. पाण्याविना ४५ मिनिटे फलंदाजी करणे खेळाडूंसाठी कठीण झाले होते. नवे नियम पाहून परिस्थितीशी ताळमेळ साधण्याचे काम पंचांनी करायला हवे.’ उभय संघांची तुलनाच होऊ शकत नाही. विंडीजचा सध्याचा संघ थोडा कमकुवत आहे. आम्ही स्वत:च्या क्षमतेनुसार खेळून वर्चस्व गाजविल्याचे कोहलीने सांगितले.
पृथ्वी म्हणाला,‘कसोटी करिअरची सुरुवात शानदार झाली. हा विजयदेखील प्रेक्षणीय ठरला. कसोटी पदार्पणात धावा काढल्यानंतर संघाला विजय मिळवून दिल्यामुळे आनंद झाला. आंतरराष्टÑीय सामने खेळण्याचे नेहमी आव्हान असतेच पण मी नैसर्गिक खेळ करण्यास प्राधान्य दिले.’
वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने फलंदाजांमध्ये एकही मोठी भागीदारी न झाल्याने सामना गमविल्याचे सांगितले. तो म्हणाला,‘भारतीय फलंदाज लौकिकानुसार खेळले शिवाय फलंदाजी कशी करायची हे आम्हाला दाखवून दिले. (वृत्तसंस्था)
‘ड्रिंक्स ब्रेक’साठीपरिस्थितीचा
विचार व्हायला हवा
भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या ‘ड्रिंक्स ब्रेक’बाबतच्या नव्या नियमावर चिंता व्यक्त केली. त्यानुसार ‘ड्रिंक्स ब्रेक’ केवळ विकेट गेल्यानंतर किंवा षटक संपल्यानंतर घेतला जाऊ शकतो, मात्र सामनाधिकारी बाहेरच्या परिस्थितीचा (उष्णता) विचार करतील, अशी आशा कोहलीने व्यक्त केली. आयसीसीने ३० सप्टेंबरला लागू केलेल्या नव्या नियमानुसार पाणी पिण्याचा ब्रेक केवळ फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा षटकांदरम्यान घेतला जाऊ शकतो, पण पंचांच्या सहमतीनुसार केंव्हाही ब्रेक घेतल्या जाऊ शकतो.
कोहली म्हणाला,‘पंचांनी नव्या नियमानुसार आम्हाला अधिक पाणी पिऊ दिले नाही. पण, कुठल्या परिस्थितीमध्ये खेळ होत आहे, याचाही विचार करायला हवा.’
नव्या नियमामुळे ओव्हररेटमध्ये सुधारणा झाली.
Web Title: Jadeja, Shaw's ability to change the picture: Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.