कॅनबेरा : जडेजा फलंदाजी करून ड्रेसिंग रूममध्ये परतला त्यावेळी त्याने घेरी येत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळेच त्याचा पर्याय म्हणून युजवेंद्र चहल याला उतरविण्यात आले. कुठल्याही क्षणी संधी मिळताच कसे तयार असायला हवे, हे चहलने दाखवून दिले असल्याचे मत फलंदाज संजू सॅमसन याने व्यक्त केले आहे.
सामना संपल्यानंतर तो म्हणाला, ‘अखेरच्या षटकात मिशेल स्टार्कचा चेंडू जडेजाच्या हेल्मेटवर आदळला होता. ड्रेसिंग रूममध्ये तो परत आला त्यावेळी फिजिओ नितीन पटेल यांनी त्याच्याकडे कसे वाटते, अशी विचारणा केली. जडेजाने त्यांना घेरी आल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. संघाचे डॉक्टर अभिजित साळवी यांच्या सल्ल्यानुसार जडेजाच्या जखमेवर नजर ठेवली जात आहे. याशिवाय त्याच्या पायाचे स्नायूदेखील ताणले गेले आहेत. १९ व्या षटकात हेजलवूडच्या गोलंदाजीत जडेजाला स्नायूदुखीचा त्रास जाणवला.