अयाज मेमन
पहिल्या डावात रवींद्र जडेजाने स्टीव्ह स्मिथला धावबाद करणे, हे सिडनी कसोटीचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. त्याआधी जोश हेजलवूडने हनुमा विहारीला शानदारपणे बाद केले. तथापि, जडेजाने थेट फेकीवर स्मिथला बाद करणे क्षेत्ररक्षणाचा उत्कृष्ट नमुना होता. २० ते ३० यार्ड्सवरून धावणे आणि चेंडूवर झेप घेत जडेजाने चेंडूला उचलून धरले, शिवाय एका यष्टीला टार्गेट करीत वेध घेणे सोपे नव्हते. त्यातही मात्र तो यशस्वी ठरला. जडेजाच्या चमकदार क्षेत्ररक्षणातील ही पहिली घटना नव्हती. भारतीय संघातून खेळताना गेली नऊ वर्षे त्याने मैदानी क्षेत्ररक्षणात वाहवा मिळविली आहे. अनेक अविस्मरणीय झेल घेण्याची किमया त्याने साधली. अत्यंत कठीण कोनातून थेट फेक करण्यात तो तरबेज असल्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दडपणदेखील आणले आहे.
भारतीय क्रिकेटमधील क्षेत्ररक्षक म्हणून म्हणून जडेजाला मी पहिल्या पाच क्षेत्ररक्षकांमध्ये स्थान देईन. ज्यांना मी पाहिले आहे त्यांच्यापैकी तो नक्कीच सर्वोत्कृष्ट पाच जणात आहे. मन्सूर अली खान पतौडी, एकनाथ सोलकर, कपिल देव आणि मोहम्मद अझरुद्दीन हे महान क्षेत्ररक्षक होते. याच मालिकेत आबिद अली, ब्रिजेश पटेल, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, रॉबिन सिंग, विराट कोहली यांचाही क्रम लागतो.
कव्हरमधील क्षेत्रक्षणात असलेल्या चपळतेमुळे पतौडी यांना टायगरची उपाधी मिळाली. १९६२ ला कर्णधारपदाची जबाबदारी आल्यानंतर क्षेत्ररक्षणावर भर देणारे पतौडी पहिले खेळाडू ठरले. बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखर आणि व्यंकटराघवन या महान गोलंदाजांच्या फिरकीसाठी पतौडी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सजवायचे.
एकनाथ सोलकर यांना फॉरवर्ड शॉर्टलेगवर क्षेत्ररक्षण सोपविण्याचे काम पतौडी यांनीच केले होते. चेंडूवर तुटून पडून अलगद झेल घेणारे अशी सोलकरांची ओळख आहे. त्यांचे धाडस किती महान ठरावे. त्याकाळी हेल्मेट नसताना शॉर्टलेगवर क्षेत्ररक्षणाला उभे राहणे शूरपणाचे लक्षण होते. सोलकर यांनी निर्धास्तपणे ते सांभाळले. कपिल देव यांच्या शरीरात नैसर्गिक लवचिकता होती. पायात प्रचंद ताकद असल्याने मैदानावर कुठल्याही टोकावर धावून जाण्याची क्षमता होती. झेल टिपण्यात ते तरबेज होते. सीमारेषेवर यष्टिरक्षकाकडे थेट फेक असो वा स्लीपमध्ये कठीण झेल घेणे असो, कपिल देव तज्ज्ञ होते. अझहरुद्दीन हे भारतीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणात निर्विवाद वर्चस्व असलेले व्यक्तिमत्त्व. अझहर क्षेत्ररक्षक या नात्याने वर्चस्व गाजवायचे.
भारतीय खेळाडू पूर्वापार चपळ क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जात नव्हते. गेल्या दोन दशकात नाट्यमयरीत्या परिस्थितीत बदल झाला. उत्कृष्ट मैदाने, तंत्रशुद्ध सराव पद्धत,सकस आहार, क्रीडा वैद्यकशास्त्र, वाढती स्पर्धा यामुळे क्षेत्ररक्षणाचा दर्जादेखील उंचावला आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये जडेजा हा नव्या दमाच्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरावा. भारतीय संघात तिन्ही प्रकारात तो नियमित खेळाडू का, याचे उत्तर त्याचे चपळ क्षेत्ररक्षण हेच आहे, डावखुरा फिरकी गोलंदाज तसेच मोक्याच्या क्षणी धावांचे योगदान देणारा फलंदाज अशी ओळखदेखील त्याने निर्माण केली. चपळ क्षेत्ररक्षणाच्या बळावर तो कसोटी क्रिकेटचा परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू ठरतो.
(लेखक लोकमत स्पोर्टचे कन्सल्टिंग एडिटर आहेत)
Web Title: Jadeja’s fielding is inspiring for emerging players
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.