Join us  

जडेजाची वनडे कारकीर्द संपली? निवडलेल्या संघात रवींद्र जडेजाचे नाव नाही

‘बीसीसीआय’ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे २०२५ च्या फेब्रुवारीत होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर लक्ष केंद्रित करून जडेजाचा पर्याय शोधत असावेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 7:51 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघ ऑगस्टच्या सुरुवातीला श्रीलंका दौऱ्यात तीन वनडे सामने खेळणार आहे. गुरुवारी वनडे संघाचीही घोषणा झाली. निवडलेल्या संघात रवींद्र जडेजाचे नाव दिसले नाही. ‘टी-२०’तून निवृत्ती घेणाऱ्या जडेजाला या दौऱ्यात विश्रांती देण्यात आली असावी, असे चाहत्यांना वाटले. त्याच वेळी अनेकांच्या भुवयादेखील उंचावल्या.

‘बीसीसीआय’ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे २०२५ च्या फेब्रुवारीत होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर लक्ष केंद्रित करून जडेजाचा पर्याय शोधत असावेत. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे जडेजाचा पर्याय म्हणून फिरकी गोलंदाजीतील अष्टपैलू खेळाडू म्हणून भविष्यात यशस्वी कामगिरी करू शकतील, असे गंभीर यांचे मत असावे.

पुढच्या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताला सहा वनडे खेळायचे आहेत. त्यातील तीन सामने लंकेविरुद्ध काही दिवसांनंतर खेळले जातील. त्यामुळे निवड समितीने  अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरला झुकते माप देत तपासून पाहण्याचा प्रयत्न केला. संघ व्यवस्थापन भविष्यातील संघ उभारणीच्या दृष्टीने अन्य पर्यायांचा शोध घेत आहे. जडेजा कसोटी क्रिकेटमधील उपयुक्त खेळाडू आहे. ‘डब्ल्यूटीसी’च्या दृष्टीने जडेजा संघात असेलच. जडेजाने १९७ वनडे खेळले असून, १३ अर्धशतकांसह २७५६ धावा केल्या आहेत. शिवाय २२० गडी बाद केले आहेत.

टॅग्स :ऑफ द फिल्ड