लंडन : भारतीय क्रिकेट संघाच्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात पराभवासोबत अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीला ‘फुलस्टॉप’ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पराभवाची समीक्षा करताना पुढील वर्षीच्या टी२० विश्वचषकासाठी संघ बांधणी डोळ्यापुढे ठेवली जाईल. कामचलावू पर्याय असलेले केदार जाधव आणि दिनेश कार्तिक यांच्यासारख्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाऊ शकतो.
महेंद्रसिंग धोनीने ज्यावेळी संघाचे नेतृत्व सांभाळले तेव्हापासून एकदिवसीय विश्वचषकासाठी किमान दोन वर्षांआधी आणि टी२० विश्वचषकासाठी १८ महिन्यांपूर्वी संघबांधणी करण्याचे धोरण सुरू आहे. मर्यादित षटकांची पुढची मोठी स्पर्धा आॅस्ट्रेलियात पुढील वर्षी टी२० विश्वचषकाच्या रूपात होणार आहे. एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती बीसीसीआयची निवडणूक होईस्तोवर प्रभारी म्हणून काम करेल. संघात बदल करण्याचे धोरण याच समितीला राबवायचे आहे.
जाधव आणि कार्तिक यांचा समावेश असलेली संघाची कमकुवत मधली फळी भारतीय उपखंडाबाहेर दडपण झुगारण्यात अपयशी ठरली. सध्याच्या संघातील ही सर्वांत मोठी उणीव होती. रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल हे तिघे महत्त्वाच्या सामन्यात केवळ एकेक धाव काढून बाद झाले.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चा अंतिम सामना गमविल्यानंतर एकदिवसीयसाठी भारताने कोअर संघ निवडला होता. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार कोहली यांनी दोन फिरकीपटूंवर विश्वास व्यक्त केला होता. कुलदीप यादव तसेच युजवेंद्र चहल यांची विश्वचषकात फार चांगली कामगिरी झाली नाही, पण दोघांंनी द्विपक्षीय मालिका मात्र गाजवल्या. विश्वचषकानिमित्त नव्हे तर त्याआधी दोन वर्षांपासून भारताकडे प्लॅन ‘बी’ नव्हता. तथापि कोहली आणि रोहित यांनी शतके ठोकून फलंदाजीतील संघाच्या उणिवा झाकून नेल्या.महेंद्रसिंग धोनी डेथ ओव्हरमध्ये आधीसारखा फलंदाजी करू शकत नाही. हार्दिक पांड्यानेही फलंदाजीत फारसे प्रभावीत केले नाही. मनीष पांड्ये आणि श्रेयस अय्यर यांना रेशी संधी मिळण्याआधीच विश्वचषकाच्या मोहिमेतून बाद करण्यात आले होते. भविष्याचा फलंदाज मानला जाणाऱ्या शुभमान गिल याला न्यूझीलंडमध्ये दोन सामन्यात संधी मिळाली, पण नंतर तो देखील संघाबाहेर झाला. जाधव आणि कार्तिक हे एखाद्या सामन्यात विजय मिळवून देऊ शकतात पण नेहमी त्यांच्यावर विसंबून राहता येणार नाही, हा धडा विश्वचषकातून मिळाला. भारताच्या पाच सदस्यीय निवड समितीला एकूण २० कसोटी सामने खेळल्याचा देखील अनुभव नाही. ही समिती खेळाडूंचा योग्य वेध घेऊ शकली नव्हती. (वृत्तसंस्था)पुढील काही वर्षे कुलदीप, बुमराह खेळतीलभविष्याचा विचार करता कोहली, रोहित, राहुल, हार्दिक, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि भुवनेश्वर हे पुढील काही वर्षे मर्यादित षटकांचे सामने खेळू शकतील. चहल आणि मोहम्मद शमी हे देखील या योजनेत सहभागी होऊ शकतील. पांडे, अय्यर आणि गिल यांना टी२० विश्वच चषकाआधी संधी मिळण्याची गरज आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी, खलिल अहमद, दीपक चाहर, राहुल चाहर, मयंक मार्कंडेय, कृणाल पांड्या आणि संजू सॅमसन यांना संधी मिळू शकेल. सॅमसन टी२० चा तज्ज्ञ खेळाडू असून त्याचे यष्टिरक्षण मात्र दर्जेदार नाही.