मुंबई - पहिल्या दिवशी त्रिपुराला १९५ धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईने दमदार फलंदाजी करताना दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ४२१ धावांची मजल मारत २२६ धावांची भक्कम आघाडी मिळवली. अडखळत्या सुरुवातीनंतर जय बिस्त (१२३) आणि सिध्देश लाड (१२३) यांनी झळकावलेल्या शतकाच्या जोरावर मुंबईने आपली पकड घट्ट केली. रणजी स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी या सामन्यात मुंबईला विजय अनिवार्य आहे.
वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी युवा गोलंदाज आकाश पारकरने ३२ धावांमध्ये ५ बळी घेत त्रिपुराची दाणादाण उडवली. अनुभवी धवल कुलकर्णीनेही ६७ धावांत ३ बळी घेत आकाशला चांगली साथ दिली. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या मुंबईची सुरुवात अडखळती झाली होती. तुफान फॉर्म असलेला पृथ्वी शॉ (१), फलंदाजीचा कणा मानला जाणारा श्रेयस अय्यर (१) आणि अनुभवी सूर्यकुमार यादव (३०) लवकर परतल्याने पहिल्या दिवसअखेर मुंबईची ३ बाद ७७ अशी घसरगुंडी उडाली होती.
यानंतर मात्र, जय बिस्त - सिध्देश लाड यांनी मुंबईला सावरले. युवा कर्ष कोठारी (१) हा देखील झटपट परतल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या लाडने बिस्तसह १४६ धावांची भागीदारी करत मुंबईला आघाडी मिळवून दिली. त्रिपुराचा कर्णधार मुरासिंग याने बिस्तला बाद करुन ही जोडी फोडली. बिस्तने १३६ चेंडूत १७ चौकारांसह १२३ धावांची खेळी केली.
बिस्तनंतर कर्णधार आदित्य तरेने लाडला चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. लाड १९७ चेंडूत १६ चौकार व २ षटकारांसह १२३ धावा करुन ए. सरकारच्या गोलंदाजीवर परतला. यानंतर ठराविक अंतराने मुंबईचे दोन बळी गेल्याने यजमानांचा डाव ८ बाद ३६० असा घसरला. तरेने १४४ चेंडूत ९ चौकारांसह ६७ धावांची शानदार खेळी केली. तसेच, धवल कुलकर्णीने केलेल्या ६० चेंडूतील नाबाद ५० धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबईने चारशेचा पल्ला पार केला. दुसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा धवल ५०, तर मिनाद मांजरेकर ८ धावांवर खेळत होते. त्रिपुराकडून कर्णधार मुरासिंग याने ७१ धावांत ५ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
त्रिपुरा (पहिला डाव) - ६०.४ षटकात सर्वबाद १९५ धावा (मनिशंकर मुरासिंग ४३, यशपाल सिंग ३३, बिषल घोष ३२; आकाश पारकर ५/३२, धवल कुलकर्णी ३/६७)
मुंबई (पहिला डाव) - १११ षटकात ८ बाद ४२१ धावा (जय बिस्त १२३, सिध्देश लाड १२३, आदित्य तरे ६७, धवल कुलकर्णी खेळत आहे ५०; मिनाद मांजरेकर खेळत आहे ८; मुरासिंग ५/७१)
Web Title: Jaffer, Siddeshwala scored a solid catch against Tripura in the final match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.