भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकादेखील गमावली. दक्षिण आफ्रिकेनं तिसऱ्या सामन्यात भारताला ४ धावांनी नमवत मालिका ३-० नं जिंकली. या सामन्यात दीपक चहरनं झुंजार अर्धशतक झळकावलं. त्यामुळे विजय दृष्टीपथात आला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेनं चहरला माघारी धाडत सामन्यात पुनरागमन केलं. या सामन्यानंतर आफ्रिकेच्या खेळाडूंनी विजयी जल्लोष केला. संघातील एका खेळाडूनं सोशल मीडियावर आनंद व्यक्त करताना रामनामाचा जयघोष केला.
भारताला व्हाईट वॉश दिल्यानंतर आफ्रिकेच्या खेळाडूंनी आनंद साजरा केला. अनेक खेळाडूंनी सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. त्यापैकी केशव महाराजनं शेअर केलेला फोटो आणि त्याखाली त्यानं दिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरलं. 'मालिका अतिशय शानदार होती. या संघाचा अभिमान वाटतो. आम्ही अतिशय मोठा प्रवास करून इथंवर आलोय. आता रिचार्ज होऊन पुढील आव्हानाचा सामना करण्याची वेळ आहे. जय श्री राम!', अशा शब्दांत केशव महाराजनं विजयानंतर स्वत:च्या भावना व्यक्त केल्या.
केशव महाराजनं एकदिवसीय मालिकेत शानदार गोलंदाजी केली. त्यानं दोनदा विराट कोहलीला बाद केलं. तिसऱ्या सामन्यात त्यानं तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. गेल्या काही वर्षांपासून महाराजच्या गोलंदाजीत सुधारणा होत आहे. संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज अशी ओळख त्यानं मिळवली आहे. महाराज तिन्ही प्रकारात संघासाठी खेळतो. ३९ कसोटीत त्यानं १३० विकेट्स घेतल्या आहेत. १८ एकदिवसीय सामन्यांत त्याच्या नावावर २२ विकेट्स आहेत. ८ टी-२० सामन्यांत त्यानं ६ फलंदाजांना माघारी धाडलं आहे.
केशवचं भारतासोबतचं नातंकेशव महाराजचं कुटुंब भारताशी संबंध आहे. त्याचा जन्म ७ फेब्रुवारी १९९० रोजी डरबनमध्ये झाला. त्याचं पूर्ण नाव केशव आत्मानंद महाराज. त्याचे पूर्वज उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधले. केशवचे पूर्वज १८७४ मध्ये कामासाठी डरबनला स्थायिक झाले.