मुंबई : भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी नेहमीच चुरस पाहायला मिळते. या शर्यतीत कधी कोणाला न्याय मिळतो, तर कधी कोणावर अन्यायही होतो. पण, संघात मधल्या फळीची समस्या अजूनही कायम आहे. अशा प्रसंगी एक खेळाडू स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण खेळी करत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 300 विकेट्स आणि 6 हजारापेक्षा अधिक धावा आहेत. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) वार्षिक पुरस्कार सोहळ्यात या खेळाडूचा गौरवही केला आहे, परंतु अजुनही त्याला टीम इंडियाकडून बोलावणे आलेले नाही. कोण आहे हा क्रिकेटपटू?
मध्य प्रदेशचा 32 वर्षीय जलाज सक्सेना स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. इंडिया ब्लू संघाचे प्रतिनिधित्व करताना जलाजने पाच दिवसांपूर्वी भारत रेड संघाविरुद्ध दोन डावांत 7 विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 300 विकेट्सचा पल्ला पार केला. शिवाय त्याच्या नावावर 6 हजारपेक्षा अधिक धावाही आहेत. जलाजला बीसीसीआयने 2017-18च्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात रणजी करंडक स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलूच्या लाला अमरनाथ पुरस्कारानं, तर सर्वाधिक विकेट घेण्यासाठीचा माधवराव सिंधिया पुरस्कारानं गौरविले होते. 2017-18च्या रणजी करंडक स्पर्धेच्या मोसमात त्यानं केरळ संघाचे प्रतिनिधित्व करताना 7 सामन्यांत 52.2 च्या सरासरीनं 522 धावा केल्या आणि 44 विकेट्सही घेतल्या. त्याने सलग चौथ्यांदा सर्वोत्तम अष्टपैलूचा पुरस्कार पटकावला आहे.