Join us  

९००० धावा व ६०० विकेट्स! असा पराक्रम करणारा तिसरा भारतीय, तरीही टीम इंडियात नाही संधी

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या या खेळाडूने आज ९००० धावा आणि ६०० विकेट्स असा दुहेरी टप्पा पार केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 1:22 PM

Open in App

रणजी करंडक स्पर्धेत रोज विक्रम झालेले पाहायला मिळत आहेत. कसोटी संघातून बाहेर बसलेल्या चेतेश्वर पुजाराचे विक्रमी १७वे द्विशतक, देवदत्त पड्डिकलची स्फोटक खेळी, रियान परागची कॅप्टन्स इनिंग्ज, ही नावे चर्चेत असताना एका खेळाडूने मोठा पल्ला गाठला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या या खेळाडूने आज ९००० धावा आणि ६०० विकेट्स असा दुहेरी टप्पा पार केला. भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा तो विनू मंकड व मदन लाल यांच्यानंतर तिसराच खेळाडू ठरला आहे. पण, या खेळाडूला भारताच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची एकही संधी मिळाली नसल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे.

उत्तर प्रदेश विरुद्ध केरळ यांच्यातल्या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात हा विक्रमवीर मिळाला... केरळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जलाज सक्सेना ( Jalaj Saxena )  याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला आज गवसणी घातली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ९००० धावा व ६०० विकेट्स असा दुहेरी पराक्रम करणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे. विनू मंकड व मदन लाल यांनी यापूर्वी हा पराक्रम केला होता. 

३७ वर्षीय जलाजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १३३ सामन्यांत ६५६७ धावा केल्या आहेत. त्यात १४ शतकं व ३२ अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. शिवाय ४१० विकेट्सही त्याने घेतल्या असून ८ बाद ३६ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने १०४ सामन्यांत ३ शतकं व ७ अर्धशतकांसह २०३५ धावा केल्या आहेत आणि ११७ विकेट्स घेतल्या आहेत. ट्वेंटी-२०त ७० सामन्यांत ६६१ धावा व ७२ बळी त्याने टिपले आहेत.

उत्तर प्रदेशने पहिल्या डावात ३०२ धावा केल्या. जलाजने २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात केरळला पहिल्या डावात २४३ धावा करता आल्या आणि त्यात जलाजने ७ धावांचे योगदान दिले. उत्तर प्रदेशने दुसरा डाव ३ बाद ३२३ धावांवर घोषित करून ३८२ धावांची आघाडी घेतली. जलाजने या डावात १ विकेट घेतली. 

टॅग्स :रणजी करंडककेरळ