James Anderson Record, ENG vs WI Test: इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ विजयाच्या समीप आहे. अँडरसनने आपल्या शेवटच्या सामन्यात एक प्रचंड मोठी आणि दमदार अशी कामगिरी करून दाखवली आहे. क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत भलेभले वेगवान गोलंदाज होऊन गेले. अनेक गोलंदाजांनी रन घेताच फलंदाजांना धडकी भरत असे. पण त्यापैकी कोणालाही न जमलेला असा एका विश्वविक्रम आज जेम्स अँडरसनने करून दाखवला.
निरोपाच्या सामन्यात जेम्स अँडरसनचा विश्वविक्रम!
जेम्स अँडरसनने वेस्ट इंडिजविरूद्धच्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात एक महाकाय असा विक्रम केला. अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ४०,००० चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा तर इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर कसोटीत ४० हजार चेंडू टाकण्याचा विक्रम करणारा तो जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. याआधी ज्या तीन गोलंदाजांनी ही कामगिरी केली होती ते सर्व फिरकीपटू होते.
- कसोटी क्रिकेटमध्ये ४०,००० चेंडू टाकणारे गोलंदाज
- मुथय्या मुरलीधरन- ४४,०३९
- अनिल कुंबळे- ४०,८५०
- शेन वॉर्न- ४०,७०५
- जेम्स अँडरसन- ४०,०००+
सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्येही अँडरसनचा बोलबाला
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांमध्येही अँडरसन चौथ्या क्रमांकावर आहे. अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० हजारांहून अधिक चेंडू टाकले आहेत. या बाबतीतही श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा अनिल कुंबळे दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Web Title: James Anderson becomes first fast bowler to bowl 40,000 deliveries in Test cricket ENG vs WI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.