ICC Test Rankings । नवी दिल्ली : आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत मोठी उलटफेर झाली आहे. 40 वर्षीय इंग्लंडचा गोलंदाज जेम्स ॲंडरसन कसोटीमधील अव्वल गोलंदाज ठरला आहे. 866 गुणांसह अँडरसनने पहिले स्थान पटकावले आहे, तर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सची घसरण झाली आहे. आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली असून पहिल्या 10 मध्ये 3 भारतीयांचा समावेश आहे. आर अश्विन, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा अनुक्रमे दुसऱ्या पाचव्या आणि नवव्या स्थानी आहेत.
दरम्यान, कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत जेम्स अँडरसनने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यासोबतच अश्विननेही 2 स्थानांनी झेप घेत दुसरे स्थान गाठले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत अप्रतिम कामगिरीचा फायदा अँडरसनला झाला आहे, तर अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. मात्र, अँडरसन आणि अश्विनला मिळालेल्या या फायद्यात पॅट कमिन्सचे चांगलेच नुकसान झाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारत दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधाराची पहिल्या स्थानावरून घसरण झाली आहे.
अँडरसनने पॅट कमिन्सच्या 1466 दिवसांच्या अव्वल स्थानाला लावला सुरूंग 40 वर्षीय अँडरसनने पॅट कमिन्सच्या1466 दिवसांच्या अव्वल स्थानाला लावला सुरूंग लावत विक्रम रचला आहे. त्याने न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात 7 बळी घेऊन कमिन्सला क्रमवारीत मोठा झटका दिला. पॅट कमिन्सची पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
कसोटी क्रमवारीतील टॉप-10 गोलंदाज
- जेम्स अँडरसन: इंग्लंड - 866 गुण
- आर अश्विन: भारत - 864 गुण
- पॅट कमिन्स: ऑस्ट्रेलिया - 858 गुण
- ओली रोबिन्सन: इंग्लंड -820 गुण
- जसप्रीत बुमराह: भारत - 795 गुण
- शाहीन आफ्रिदी: पाकिस्तान - 787 गुण
- कगिसो रबाडा: दक्षिण आफ्रिका - 776 गुण
- काइल जेमिसन: न्यूझीलंड - 765 गुण
- रवींद्र जडेजा: भारत - 763 गुण
- मिचेल स्टार्क: ऑस्ट्रेलिया - 735 गुण
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"