मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत यजमानांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. लॉर्ड्स कसोटी गाजली ती जेम्स अँडरसनच्या विक्रमी कामगिरीने. लॉर्ड्सवर शंभर विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. त्याशिवाय 550 विकेटचा पल्ला पार करणारा तो इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. याच कामगिरीमुळे त्याने ICCच्या कसोटी गोलंदाजांमध्ये विक्रमी गुणांसह अव्वल स्थान पटकावले. 38 वर्षांनंतर इंग्लंडच्या एखाद्या गोलंदाजाने 900 गुणांचा टप्पा ओलांडण्याचा पराक्रम केला.
अँडरसनच्या खात्यात 903 गुण आहेत आणि 1980 मध्ये इयान बॉथम यांनी 911 गुणांची कमाई केली होती. लॉर्ड्स कसोटीत त्याने दोन्ही डावांत मिळून 43 धावा देत 9 विकेट घेतल्या होत्या.