नवी दिल्ली : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स ॲंडरसनने (James Anderson) गुरूवारी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (South Africa) मॅनचेस्टरमधील कसोटी सामन्यात ॲंडरसनने ही किमया साधली. लक्षणीय बाब म्हणजे ॲंडरसनने आपल्या संघासाठी क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. तसेच आपल्या घरच्या मैदानावर 100 कसोटी सामने खेळणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
ॲंडरसनने केला विश्वविक्रम दरम्यान, 40 वर्षीय ॲंडरसनने 174 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 658 बळी पटकावले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर स्थित आहे. या यादीत श्रीलंकेचा मुथैया मुरलीधरण 800 बळींसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे, तर 708 बळी घेणारा ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच क्रिकेटमधील दिग्गज सचिन तेंडुलकरने आपल्या घरच्या मैदानावर एकूण 94 कसोटी सामने खेळले असून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पॉंटिगने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर एकूण 92 कसोटी सामने खेळले आहेत. तर जेम्स ॲंडरसनचा सहकारी खेळाडू स्टुअर्ट ब्रॉडने 91 कसोटी सामने खेळून या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
सध्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. लॉर्ड्समध्ये पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जेम्स ॲंडरसनने केवळ 1 बळी घेतला होता. पहिल्या सामन्यात विजय मिळवून 3 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर आज सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.