आयपीएलच्या मेगा लिलावाची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. IPL मधील १० संघांनी रिटेन रिलीजचा डाव खेळल्यावर आता सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात फ्रँचायझी संघ खेळाडूंवर बोली लावताना दिसणार आहेत. मेगा लिलावात सहभागी झालेल्या खेळाडूंच्या मोठ्या गर्दीत एका कोचचाही समावेश आहे. आता मग या भिडूची चर्चा होणार नाही असं कसं होईल. तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कोण आहे तो कोच? जो आयपीएलच्या माध्यमातून पुन्हा खेळाडूच्या रुपात क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी आहे उत्सुक जाणून घेऊया यासंदर्भातील सविस्तर माहिती
कोण आहे तो कोच? जो खेळाडूच्या रुपात IPL खेळण्यासाठी आहे उत्सुक?
हा कोच म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे इंग्लंडचा स्टार माजी गोलंदाज जेम्स अँडरसन. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर जेम्स आपल्या राष्ट्रीय संघाच्या ताफ्यात गोलंदाजी कोचच्या रुपात जबाबदारी पार पाडताना दिसतोय. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर त्याने टी-२० क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता आयपीएलमध्ये नाव नोंदणी करून तो हे स्वप्न साकार करण्यासाठी मैदानात उतरला आहे. १० वर्षांपूर्वी त्याने अखेरचा टी २० सामना खेळला होता. या खेळाडूवर कोण बोली लावणार ते पाहण्याजोगे असेल.
कसोटीत ७०० पेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाची मूळ किंमत किती?
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७०४ विकेट्स खात्यात जमा करण्याचा खास विक्रम असणाऱ्या इंग्लंडच्या या गोलंदाजानं १.२५ कोटी या मूळ किंमतीसह आयपीएल लिलावात नाव नोंदणी केली आहे. ४२ वर्षीय गोलंदाजाची चेंडू स्विंग करण्याचं कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर IPL लिलावात त्याच्यावर बोली लावण्यासाठी अनेक फ्रँचायझीसंघ पुढे येऊ शकतील.
CSK च्या संघाला सुपर कॉम्बोचा डाव साधण्याची असेल संधी
आयपीएलमध्ये अनेक असे फ्रँचायझी संघ आहेत जे अनुभवी खेळाडूंना पसंती देतात. त्यात चेन्नई सुपर किंग्स अगदी आघाडीवर असल्याचे दिसते. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने गोलंदाजाच्या रुपात फक्त मथीशा पथिराना याला रिटेन केले आहे. तो डेथ ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी करतो. दुसरीकडे इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाजाकडे नव्या चेंडूवर प्रतिस्पर्धी संघाला नाचवण्याची ताकद आहे. CSK संघाला सुपर कॉम्बोचा डाव साधण्यासाठी जेम्स अँडरसनचा सौदा फायद्याचा ठरू शकतो. ते त्याच्यासह जाणार का? ते पाहण्याजोगे असेल.
हे फ्रँचायझी संघही दाखवू शकतात रस
चेन्नई सुपर किंग्सशिवाय आरसीबी, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघालाही जेम्स अँडरसनसारख्या अनुभवी गोलंदाजाची गरज आहे. पंजाबच्या संघाच्या पर्समध्ये अधिक पैसा असल्यामुळे मनात आणलं तर हा फ्रँचायझी संघ इंग्लंडच्या या गोलंदाजासाठी तगडी बोली लावण्यात आघाडीवर राहिल्याचे पाहायला मिळू शकते.