Join us  

James Anderson: शानदार.. जबरदस्त.. झिंदाबाद! जेम्स अँडरसनच्या २२ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला विजयी निरोप

शेवटच्या कसोटीत अँडरसनचा बळींचा चौकार, नवख्या अटकिन्सनचे १२ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 11:38 PM

Open in App

James Anderson Retires, ENG vs WI Test: इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्समध्ये खेळला गेला. या सामन्यात यजमान इंग्लंडने एक डाव आणि ११४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संस्मरणीय निरोप घेतला. अँडरसनने या कसोटी सामन्यात पहिल्या डावात एक आणि दुसऱ्या डावात तीन असा बळींचा चौकार मारला. त्याने ४०,००० हजारांहून अधिक चेंडूत टाकून ७०४ कसोटी विकेट्ससह आपली कारकीर्द पूर्ण केली.

---

इंग्लंडच्या विजयात अटकिन्सन चमकला!

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात १३६ धावांवर बाद झाला. तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात ३७१ धावा केल्या होत्या आणि २५० धावांची आघाडी मिळवली होती. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात केवळ १२१ धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला वेगवान गोलंदाज गस अटकिन्सन. पदार्पणाच्या कसोटीत त्याने पहिल्या डावात सात आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेतले.

२२ वर्षांची संस्मरणीय कारकीर्द

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी जेम्स अँडरसनला त्याच्या सहकारी खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर दिला. ४१ वर्षीय जेम्स अँडरसनने २००३ मध्ये लॉर्ड्सवर झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. अँडरसनने डिसेंबर २००२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो १८८ कसोटी सामने खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगात फक्त सचिन तेंडुलकरनेच अँडरसनपेक्षा जास्त (२०० कसोटी) सामने खेळले आहेत. अँडरसन हा ७०० कसोटी बळी मिळवणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज आहे.

टॅग्स :जेम्स अँडरसनइंग्लंडवेस्ट इंडिज