मुंबई : ‘इंग्लंडमध्ये खेळताना त्यांचा वेगवान गोलंदाज जेम्स अॅन्डरसन याचा सामना करणे फारच आव्हानात्मक असते.’ कारकिर्दीत प्रत्येक प्रकारच्या खेळपट्ट्यांवर अनेक दिग्गज गोलंदाजांचा सामना करणारा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने हे वक्तव्य केले आहे.अजिंक्य रहाणे हा भारतीय कसोटी संघाचा अविभाज्य हिस्सा आहे. मधल्या फळीत भारताचा महत्त्वाचा फलंदाज या नात्याने अजिंक्य अद्याप कसोटी संघातील स्थान टिकवून आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजिंक्यला जागा मिळवता आलेली नसली, तरीही कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्यला पर्याय नाही. गेल्या काही मालिकांमध्ये गरजेच्या वेळी अजिंक्यची खेळी आश्वासक राहिलेली आहे. आतापर्यंत अजिंक्यने अनेक दिग्गज गोलंदाजांचा सामना केला आहे.अजिंक्य हा इंडियन आॅईलचा कर्मचारी आहे. त्याच्या कंपनीने बुधवारी लाईव्ह इन्स्टाचॅटचे आयोजन केले होते. यावेळी तो म्हणाला, ‘इंग्लंडमध्ये जेम्स अॅन्डरसनचा सामना करणे अत्यंत कठीण असते. खेळपट्टी आणि हवामानाचा अचूक वेध घेणारा अॅन्डरसन हा एकमेव गोलंदाज असा आहे की ज्याच्यापुढे खेळताना मला आव्हानात्मक वाटते.’कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेची भारताबाहेर कामगिरी चांगली राहिली आहे. कसोटीत ४ हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या अजिंक्यच्या नावावर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये शतकाची नोंद आहे. भारतात सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे सर्व क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. आयपीएलचे १३ वे पर्व बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी स्थगित केले आहे. लॉकडाऊनच्या काळात मानसिक फिटनेस राखणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत अजिंक्यने व्यक्त केले. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- इंग्लंडमध्ये अॅन्डरसनचा सामना करणे कठीण- अजिंक्य रहाणे
इंग्लंडमध्ये अॅन्डरसनचा सामना करणे कठीण- अजिंक्य रहाणे
कोरोना ‘लॉकडाऊन’मध्ये मानसिक फिटनेस राखण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 12:43 AM