James Faulkner, Pakistan, PSL 2022 : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉकनर याने पाकिस्तान सुपर लीगमधून (Pakistan Super League 2022) तडकाफडकी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सामने खेळण्यासाठी मानधन मिळत नसल्याच्या वादातून त्याने निर्णय घेतला. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याने याबद्दल माहिती दिली. 'पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मला फसवलं', असा गंभीर आरोप जेम्स फॉकनरने PCB वर केला. तो स्पर्धा सोडून गेल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला PSL मध्ये आजीवन बंदी घातली. त्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने त्याच्यावर खटल दाखल करत त्याला पोलिसांनी ताब्यात घेण्याची मागणी केली.
"जेम्स फॉकनरने तथ्यहीन आरोप केले. जेव्हा त्याला समजलं की आपला तमाशा इथे चालणार नाही त्यावेळी दारू पिऊन धिंगाणा घालत त्याने हेल्मेट हॉटेलच्या झुंबरावर फेकलं. त्याने हॉटेलच्या मालमत्तेचं नुकसान केलं. तेथील लोकांशी गैरवर्तणुक केली. त्याने फेकलेलं हेल्मेट अजूनही झुंबरावरच आहे. त्यामुळे माझी अशी मागणी आहे की फॉकनरला पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे", असं सलमान बट यू ट्युब चॅनेलच्या व्हिडीओमध्ये म्हणाला.
"त्याने हेल्मेट फेकून दिलं त्यावेळी झुंबराच्या खाली अनेक लोकं उभी होती. जर त्याने हेल्मेट फेकल्यानंतर त्या झुंबराचा एखादा भाग खाली कोसळला असता तर काय करणार होतात? जर त्याने फेकलेलं हेल्मेट कोणाच्या लागलं असतं तर काय झालं असतं? त्यामुळेच त्याच्या पोलिसांनी खटला दाखल करून त्याला ताब्यात घेतलं पाहिजे", अशी मागणीही सलमान बट याने केली.
फॉकनर क्वेटा संघाकडून गेल्या तीन सामन्यात खेळला नव्हता. मानधनाच्या मुद्द्यावरून तो बराच काळ नाराज असल्याचे समजलं होतं. याबाबत PCBच्या अधिकाऱ्यांशी तो सतत संपर्कात होता. इएसपीएनक्रिकइन्फो दिलेल्या वृत्तानुसार, १८ फेब्रुवारीला हे प्रकरण खूपच तापलं. त्यावेळी फॉकनरने हॉटेलच्या लॉबीतच बॅट आणि हेल्मेट फेकून दिलं आणि स्पर्धा सोडून तो तडक विमानतळाकडे रवाना झाला.