साउथम्पटन : न्यूझीलंडने विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात रविवारी तिसऱ्या दिवशी भारताने केलेल्या २१७ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने बिनबाद ३६ धावा केल्या. त्या आधी काईली जेमिसनने पहिल्या डावात पाच बळी घेत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले.
चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा टॉम लॅथम १७ आणि डेवोन कॉनवे १८ धावांवर खेळत होते. त्या आधी भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने सर्वाधिक ४९ धावा केल्या तर विराट कोहलीला ४४ धावा करता आल्या. न्यूझीलंडचा जेमिसन हा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३१ धावा देत पाच बळी घेतले. नील वॅगनर आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन तर टीम साऊदी याने एक बळी घेतला.
तिसऱ्या दिवशी रविवारी सकाळी भारताने तीन बाद १४६ वरून खेळायला सुरुवात केली. पहिल्या सत्रात कोहली, रहाणे, ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन हे बाद झाले. भारताने उपहारापर्यंत सात बळी २११ धावा केल्या. भारताच्या तळाच्या फलंदाजांनी गोलंदाजीसाठी अनुकुल परिस्थितीत नव्या चेंडूंचा सामना करणे सोपे नव्हते. उपहारानंतर १९ चेंडूत सहा धावांमध्येच तीन फलंदाज बाद झाले. परिस्थिती गोलंदाजांसाठी अनूकुल असली तरी अशा स्थितीत २५० हा चांगला स्कोअर मानला जात होता. मात्र ढगाळ वातावरण असल्याने फलंदाजी करणे कठीण नव्हते. जेमिसन बोल्ट, आणि वॅगनर यांनी परिस्थितीचा फायदा घेतला. भारतीय फलंदाजांकडे सीम, स्विंग आणि शॉर्ट पीच चेंडूंचे उत्तर नव्हते.
कोहलीला कालच्या धावसंख्येत एका धावेचीही भर घालता आली नाही. जेमिसनने त्याला अडचणीत आणले. तो किवी संघाच्या जाळ्यात अडकला. बोल्ट आणि जेमिसन यांनी ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू टाकले. ही रणनीती त्याच्या लक्षात आली. मात्र जेमिसनचा एक चेंडू थेट त्याच्या पॅडवर आदळला. त्यावर कोहलीने डीआरएस घेतला. मात्र त्याला तंबुत परत जावे लागले.
ऋषभ पंत याला देखील जेमिसनने बाद केले. कोहलीसोबत ६१ धावांची भागिदारी करणाऱ्या रहाणेला वाटले की धावांची गती वाढवली पाहिजे. त्याने काही चांगले शॉट खेळले मात्र नील वॅगनरच्या चेंडूवर चुकलेल्या टाईमिंगने त्याने लॅथमकडे झेल दिला. आणि अर्धशतक करु शकला नाही. अश्विनने उपयोगी २२ धावा केल्या. जाडेजाने १५ धावा जोडल्या.
धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. साऊदी,गो जेमिसन ३४, शुभमन गिल झे. वॅटलिंग गो. वॅगनर २८, चेतेश्वर पुजारा पायचीत गो. बोल्ट ८, विराट कोहली पायचीत गो. जॅमिसन ४४, अजिंक्य रहाणे झे. लॅथम, गो. वॅगनर ४९, ऋषभ पंत झे. लॅथम गो. जेमिसन ४, रवींद्र जाडेजा झे. लॅथम गो. साऊदी १५, आर. अश्विन झे. लॅथम गो. साऊदी २२, इशांत शर्मा झे. टेलर गो. जेमिसन ४, जसप्रीत बुमराह पायचीत गो. जॅमिसन ०, मोहम्मद शमी नाबाद ४, अवांतर ५ एकूण ९२.१ षटकांत सर्वबाद २१७ गडी बाद क्रम १-६२, २-६३,३-८८,४-१४९, ५-१५६,६-१८२, ७-२०५,८-२१३,९-२१३,१०-२१७, गोलंदाजी - टीम साऊदी २२-६-६४-१, ट्रेंट बोल्ट २१.१-४-४७-२, काईली जेमिसन २२-१२-३१-५, कॉलिन डी ग्रॅण्ड होम १२-६-३२-०, नील वॅगनर १५-५-४०-२.