मुंबई : जगभरात तंत्रज्ञान प्रचंड विकसित झाले आहे. त्यामुळे एकमेकांशी संवांद साधणेही सोपं झालं आहे. पण, आजच्या घडीला सहकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी एकाच क्रिकेट संघातील खेळाडूंना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सपर्कासाठीची फोन सुविधा बंद असल्याने खेळाडूंना सुचना देण्यासाठी संघ व्यवस्थापनाला चक्का टीव्हीवर जाहिरात द्यावी लागत आहे. जगाच्या पाठीवर असा प्रकार घडत आहे तो भारतातल्या जम्मू-काश्मीर येथे. चला तर जाणून घेऊया कारण...
जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर तेथे कोणतीही दंगा घडू नये यासाठी केंद्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीनं तेथील फोन्स व इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर क्रिकेट संघातील खेळाडूंशी संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनने खेळाडूंशी संपर्क साधण्यासाठी चक्क टीव्ही चॅनेलवर टिकर ( कार्यक्रमात खालच्या पट्टीत येणाऱ्या जाहीराती) चा उपयोग केला आहे. टिकरद्वारे असोसिएशन खेळाडूंशी संपर्क साधत आहेत, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
मागील महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या भितीमुळे शंभराहून अधिक क्रिकेटपटूंना माघारी बोलावण्यात आले होते. त्यानंतर 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आणि हिंसाचार टाळण्यासाठी इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती. त्यामुशे असोसिएशनला खेळाडूंनी संपर्क साधणे अवघड जात होते. खेळाडूंशी संपर्क कसा साधावा यासाठी एक बैठक पार पडली. त्या बैठकीला जम्मू काश्मीर संघाचा मेंटर आणि भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण, व्यवस्थापक सी के प्रसाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साह बुखारी यांनी टिकरद्वारे खेळाडूंशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला.
वृत्तपत्रात जाहीरात देऊन खेळाडूंशी संपर्क साधण्याचा विचार सुरू होता, परंतु त्यानंतर टीव्ही माध्यमाचा वापर करण्याचा निर्णय झाला, असे बुखारी यांनी सांगितले. ''मागील तीन आठवड्यापासून अनेक खेळाडूंशी संवागच होऊ शकलेला नाही. परवेझ रसूल जम्मूत आला असताना गेल्या आठवड्यात त्याच्याशी चर्चा झाली होती. पण, येथे क्रिकेट सराव शिबीर नसल्यानं त्यानं जम्मू सोडलं. त्यानंतर त्याच्याशीही संवाद झालेला नाही. प्रत्येक खेळाडूकडे माणूस पाठवण्याचाही आम्ही विचार केला होता, परंतु ते शक्य नाही. त्यामुळे आम्ही टीव्हीवर जाहीरातीद्वारे खेळाडूंना माहिती देत आहोत,'' असे पठाणने सांगितले.