नवी दिल्ली : जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर भारताला नवीन क्रिकेटपटू मिळतील अशी चर्चा रंगली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता लडाख हा केंद्रशासित प्रदेश झाला आहे. त्यामुळे आता लडाख क्रिकेट संघटना आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर त्यांचा संघही आता रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळू शकतो. सध्याच्या घडीला रणजी स्पर्धेत 37 संघ खेळत आहे. पण यापुढे 38वा संघ रणजी स्पर्धेत दिसतील अशा चर्चा रंगल्या होत्या. पण, प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.
स्थानिक क्रिकेटमध्ये लडाखचे खेळाडू जम्मू आणि काश्मीर संघाचेच प्रतिनिधित्व करतील, असे राय यांनी स्पष्ट केले. सरकारने सोमवारी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर लडाख आणि जम्मू-काश्मीर असे दोन केंद्रशासित प्रदेश झाले आहेत. पण, या नव्या केंद्रशासित प्रदेशांसाठी बीसीसीआयकडे वेगळी राज्य संघटना नाही. राय म्हणाले,''लडाखसाठी वेगळी राज्य क्रिकेट संघटना तयार करण्याचा विचार सध्या नाही. त्यामुळे या भागातील खेळाडू जम्मू-काश्मीर संघाचेच प्रतिनिधित्व करतील. त्यासाठी ते निवड चाचणीत सहभाग घेतील.''
जम्मू-काश्मीरच्या रणजी क्रिकेट संघात आतापर्यंत एकाही लडाखवासी खेळाडू खेळलेला नाही. आगामी रणजी करंडकाचा हंगाम डिसेंबरपासून सुरू होईल. पुद्दुचेरीप्रमाणे लडाखलाही बीसीसीआयला मतदानाचा हक्क मिळेल का, या प्रश्नावर राय म्हणाले,''याची मुद्यावर अजून चर्चा झालेली नाही. आधीच्या नियमानुसारच सर्व सुरू राहिल. चंदीगढ हाही केंद्रशासित प्रदेश आहे आणि तेथील खेळाडू पंजाब किंवा हरयाणा क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करू शकतात.''