सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय संघातील खेळाडूंनी सार्थ ठरवला. 'जम्मू एक्सप्रेस' उमरान मलिकचा वेगवान भेदक मारा आणि त्याला इतर गोलंदाजांची मिळालेली साथ यामुळे SRH ने पंजाब किंग्जला १५१ धावांवर ऑल आऊट केले. लियम लिव्हिंगस्टोनने दमदार ६० धावांची खेळी केली. पण शेवटच्या षटकात उमरान मलिकने एकही धाव न देता तीन बळी टिपले, तसेच एक फलंदाज धावचीतही झाला. त्यामुळे पंजाबला १५१ धावांपर्यंतच मजल मारता आली.
--
दरम्यान, पंजाबच्या डावाबाबत बोलायचे झाल्यास, मयंकला विश्रांती दिल्याने हंगामी कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन दोघे सलामीला आले. धवन ८ तर प्रभसिमरन १४ धावांवर बाद झाला. जॉनी बेअरस्टो (१२) आणि जितेश शर्मा (११) हे दोघेही स्वस्तात बाद झाले. लियम लिव्हिंगस्टोनने मात्र शाहरुख खानच्या साथीने दमदार भागीदारी केली. शाहरूख खान २६ धावांवर माघारी परतला. पण लियम लिव्हिंगस्टोनने अर्धशतक ठोकले. त्याने ३३ चेंडूत ६० धावा केल्या. शेवटच्या टप्प्यात ओडियन स्मिथकडून अपेक्षा होती. पण उमरान मलिकने २०व्या षटकात पहिल्या चेंडूवर त्याला माघारी धाडले. त्यानंतर पुढील तीन चेंडूत २ बळी टिपले. त्याला हॅटट्रिकची संधी हुकली, पण रन आऊट झाल्याने टीमची हॅटट्रिक झाली.