श्रीनगर: भारतीयांसाठी क्रिकेट अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. देशातील कानाकोपऱ्यात क्रिकेट खेळले जाते. धडधाकट शरीरयष्टी असलेला व्यक्ती असो किंवा एखादा अपंग व्यक्ती असो, प्रत्येकजण क्रिकेटचा चाहता आहे. विशेष म्हणजे, आपल्या देशात पॅरा क्रिकेटही खेळले जाते. या पॅरा क्रिकेटमध्ये अपंग खेळाडू क्रिकेट खेळतात. अशाच एक पॅरा क्रिकेटर सध्या चर्चेत आला आहे.
जम्मू-काश्मीरच्या बिजबेहाराजवळ वाघमा गावात राहणाऱ्या 34 वर्षीय आमिर हुसैन लोनची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. आमिर हुसैन सध्या जम्मू-काश्मीरच्या पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. आमिर 2013 पासून व्यावसायिक क्रिकेट खेळतोय. त्याच्या एका शिक्षकाने त्याची क्रिकेट प्रतिभा शोधली आणि त्याला पॅरा क्रिकेटची ओळख करुन दिली.
आमिरचा व्हिडिओ पाहून तुम्हीची चकीत व्हाल. तो चक्क आपली हनुवटी आणि खांद्याच्या मध्ये बॅट ठेवून फलंदाजी करतो. तसेच, उजव्या पायाच्या दोन बोटांचा वापर करून स्विंग बॉलिंग करतो. आमिरने आठ वर्षांचा असताना वडिलांच्या गिरणीत अपघाताचा बळी ठरला आणि यातच त्याने आपले दोन्ही हात गमावले.
आमिर म्हणतो की, अपघातानंतर लोकांनी माझ्या वडिलांना सांगितले की, मी त्यांच्यावर ओझे बनेन. पण, तेव्हाच मी विचार केला होता की, मी घरच्यांवर कधीच ओझे बनणार नाही. या समस्येशी लढण्याचा निर्णय मी तेव्हाच घेतला होता. विशेष म्हणजे, आमिर हात नसताना चांगल्याप्रकरणी पोहतो. यासाठी तो बदकाप्रमाणे फक्त पायांचा वापर करतो.