Jammu Kashmir Riasi Attack : पाकिस्तान आणि दहशतवाद हे जुनं नातं आहे. सातत्याने दहशतवाद्यांना बळ देणाऱ्या पाकिस्तानविरोधात त्यांच्याच देशातील आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या क्रिकेटपटूने आवाज उठवला आहे. ९ जून रोजी जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाला, तर ४१ जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केल्यानंतर एक गोळी चालकाला लागली, ज्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले अन् गाडी थेट दरीत कोसळली. पण, गाडी दरीत कोसळल्यामुळे अनेकांचा जीव वाचला. बस दरीत कोसळली नसली तर इतर सर्व लोकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या असत्या, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. या घटनेवर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. सध्या सोशल मीडियावर ट्रेन्ड असलेले वाक्य म्हणजे 'ऑल आइस ऑन...", याचा वापर करत हसन अलीने लिहिले की, ALL EYES ON VAISHNO DEVI ATTACK. हसन अली पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघापासून दूर आहे. त्याला ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नाही. खरे तर हसन अलीची पत्नी भारतीय आहे.
ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या तोंडावर पाकिस्तानी संघ ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. चार सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने पावसाच्या कारणास्तव रद्द करावे लागले. दोन सामन्यांमध्ये यजमान इंग्लिश संघाने विजय मिळवून मालिका २-० ने खिशात घातली. तेव्हाही हसन अली पाकिस्तानच्या संघाचा हिस्सा नव्हता. तो इंग्लंडमध्ये आयोजित टी-२० ब्लास्टमध्ये खेळत आहेत.
दरम्यान, ट्वेंटी-२० विश्वचषकात पाकिस्तानला तीनपैकी केवळ एक सामना जिंकता आला आहे. शेजाऱ्यांचा साखळी फेरीतील अखेरचा सामना आयर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून सुपर-८ त्या शर्यतीत टिकून राहण्याचे मोठे आव्हान पाकिस्तानसमोर आहे. कारण दुसरीकडे याच गटातील अमेरिकेने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत.
Web Title: Jammu Kashmir Riasi Attack Pakistani cricketer Hasan Ali condemned the terrorist attack
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.