दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेननं शनिवारी क्रिकेटच्या मैदानावर झोकात पुनरागमन केले. त्यानं मॅझन्सी सुपर लीगमध्ये केप टाऊन ब्लित्झ संघाचे प्रतिनिधित्व करताना जोझी स्टार्सच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले. या सामन्यात ब्लित्झच्याच जॅन्नेमॅन मलानच्या फटकेबाजीनंही सर्वांचे लक्ष वेधले. मलाननं 59 चेंडूंत 99 धावांची नाबाद खेळी करताना संघाच्या विजयाच मोलाचा वाटा उचलला.
दक्षिण आफ्रिकेतील या ट्वेंटी-20 लीगचा पहिला सामना आज खेळवण्यात आला. त्यात डेल स्टेनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. स्टेन दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. केप टाऊन ब्लित्झ संघाचे प्रतिनिधित्व करताना स्टेननं तुफानी गोलंदाजी केली. केप टाऊन संघाने प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 213 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर मलानने 59 चेंडूंत 11 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 99 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर त्याला एक धाव घेण्यात अपयश आलं आणि त्याचं शतक हुकलं. कर्णधार क्विंटन डी कॉकनं ( 35), मोईन अली ( 25), लिएम लिव्हिंगस्टन ( 21) आणि जॉर्ज लिंडे (24*) यांनी योगदान दिले.