Women’s Premier League 2023 - भारतीय महिला क्रिकेटसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. महिला प्रीमिअर लीग २०२३ आजपासून सुरू होतेय आणि पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स व गुजरात जायंट्स समोरासमोर आहेत. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे आणि भारतीय महिला क्रिकेटसाठी हा मैलाचा दगड मानला जातोय... WPL मुळे भारताच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावान मुलींना आपल्यातील क्रिकेट कौशल्य जगाला दाखवण्याचं हक्काचं व्यासपीठ मिळणार आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातून अशीच एक प्रतिभावान खेळाडू दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून आपलं कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.
शोपियान हा जिल्हा दहशतवादाशी संबंधित बातम्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. याच जिल्ह्यातील ब्रारीपोरा गावातील ३४ वर्षीय खेळाडू जसिया अख्तर ( Jasia Akhtar) हिची महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्रासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने निवड केली आहे. तिला २० लाख रुपयांमध्ये दिल्लीने संघात समाविष्ट केले आहे. लिलावात तिची निवड झाल्यानंतर गावात जल्लोष झाला होता. अत्यंत खडतर प्रवास करून येथे पोहोचलेल्या जसियाचा जम्मू-काश्मीरमध्ये मुलींसाठी क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा मानस आहे. तिला WPL मध्ये चांगली कामगिरी करून छाप पाडण्याची आशा आहे.
जसियाने वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ''मुलींना त्यांच्या परिसरात बाहेर जाणे अवघड आहे. मात्र, वडिलांनी मला क्रिकेट खेळण्यासाठी पाठिंबा दिला. मग मी चुलत बहिणीसोबत खेळू लागली. माझ्या भागात सहा-सात महिने बर्फ पडतो आणि दोन महिने पाऊस पडतो. त्यामुळे उरलेल्या दिवसांत आम्हाला क्रिकेट खेळायला मिळते. कधी रस्त्यांवर, कधी खडकाळ भागात खेळायचो,''असे जसियाने सांगितले. तिचे वडील सफरचंदाची शेती करतात व आई गृहिणी आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही जसियाची आदर्श आहे. तिला ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगकडून खूप काही शिकण्याची संधी मिळाली आहे. जसियाने सांगितले की, ''मी जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा क्रिकेट किटबद्दल कोणतीही माहिती नव्हती. २०१२-१३ मध्ये जेव्हा मी जम्मू-काश्मीरसाठी खेळत होतो, तेव्हा हरमनप्रीतने मला बॅट भेट दिली होती. मी चार वर्षे त्या बॅटने क्रिकेट खेळले. २०१९ मी क्रिकेट किट घेतली.''
जसिया सांगते की, २००६-०७ मध्ये एकदा दहशतवादी माझ्या घरात घुसले आणि मला मारहाण केली. त्यानंतर काही काळ मला क्रिकेट सोडावे लागले. पण, त्या घटनेनंतर माझा निर्धार अधिक दृढ झाला. माझ्या कुटुंबाने मला नेहमीच पाठिंबा दिला. त्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. WPL काश्मीरमधील अनेक मुलींना प्रेरणा देईल, अशी मला आशा आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"