Jason Holder's double-hattrick in the final over - वेस्ट इंडिजनं पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवताना मालिका ३-२ अशी जिंकली. जेसन होल्डर या सामन्याचा नायक ठरला. अखेरच्या षटकातील शेवटच्या चार चेंडूंवर त्यानं विकेट्स घेत इतिहास रचला अन् वेस्ट इंडिजला १७ धावांनी विजय मिळवून दिला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त हॅटट्रिक घेणारा तो विंडीजचा पहिला गोलंदाज ठरला. या सामन्यात जेसन होल्डरनं २७ धावांत ५ विकेट्स घेतल्या, तर संपूर्ण मालिकेत १५ विकेट्स घेतल्यामुळे त्याला मॅन ऑफ दी सीरिज या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. वेस्ट इंडिजच्या या कामगिरीनं भारतीय संघाला त्यांच्यासमोरील आव्हान तगडं असेल, याची जाण नक्की झाली असेल.
लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर ढेपाळल्यानंतर जेम्स व्हिंस व सॅम बिलिंग यांनी संघर्ष केला. मोईन अली व लिव्हिंगस्टोन यांनाही कमाल दाखवता आली नाही. अकिल होसैन ( ४-३०) यानं सुरुवातीला धक्के दिल्यानंतर जेसन होल्डरनं विंडीजला मोईन अलीची ( १४) महत्त्वाची विकेट मिळवून दिली. पण, जेम्स व्हिंस व सॅम बिलिंग यांनी फटकेबाजी केली. व्हिंस ३५ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५५ धावांवर होसैनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
इंग्लंडला अखेरच्या षटकात विजयासाठी २० धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे चार विकेट्स शिल्लक होत्या. जेसन होल्डरनं पहिलाच चेंडू नो बॉल टाकला अन् त्यावर इंग्लंडने एक धाव घेतली. आता ६ चेंडूंत १८ धावा असे गणित बनले. पण, होल्डरनं पुढील चेंडू निर्धाव फेकला. त्यानंतर ख्रिस जॉर्डन ( ७), सॅम बिलिंग ( ४१), आदिल ऱाशिद ( ०) व साकिब महमूद ( ०) यांना सलग चार चेंडूवर माघारी पाठवून इंग्लंडचा डाव १६२ धावांवर गुंडाळला. वेस्ट इंडिजनं ही मालिका ३-२ अशी जिंकली.