Jasprit Bumrah vs Mohammad Shami: भारतीय संघाने गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली. २०२१च्या सुरूवातीला भारताने ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकली. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावरही भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताला अपेक्षित यश मिळालं नाही. पण त्यानंतर न्यूझीलंडविरूद्धची मालिकादेखील भारताने जिंकली. या सर्व मालिकांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारताच्या वेगवान गोलंदाजांनी, विशेषत: मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी दमदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराह हा भारतीय गोलंदाजीचा सध्या कणा मानला जातो. तर शमीला अनुभवी गोलंदाज म्हटलं जातं. या दोघांमध्ये नक्की कोण भारी असा प्रश्न चाहत्यांना नेहमीच पडत असतो. पाहूया याच संबंधी आकडेवारी...
सध्याच्या घडीला जसप्रीत बुमराह हा भारतीय वेगवान गोलंदाजीचा पोस्टर बॉय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत बुमराहपेक्षा शमीने कसोटी क्रिकेटमध्ये जास्त यश मिळवलं आहे. मोहम्मद शमीने तीन वर्षात १६ कसोटी सामने खेळले असून २१.१७च्या सरासरीने धावा दिल्या आहेत आणि ५८ गडी बाद केले आहेत. बुमराहने तितकेच कसोटी सामने खेळत २३. ८०च्या सरासरीने धावा दिल्या असून ५५ गडी तंबूत पाठवले आहेत. तसेच, गेल्या ५ कसोटीतही शमीने १७ बळी टिपले आहेत.
मोहम्मद शमीने टीम इंडियात पदार्पण केल्यानंतर काही काळाने तो संघाबाहेर गेला होता. त्याच्या कामगिरीत सुधारणा होत नसल्याने त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. पण IPLमध्ये त्याने चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला संघात पुन्हा स्थान मिळाले. त्यावेळचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण यांनी त्याला योग्य मार्गदर्शन केल्यामुळेच त्याने उत्तम कामगिरी करून दाखवली.
Web Title: Jaspreet Bumrah vs Mohammad Shami Who is Better Bowler See interesting stats records
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.