अहमदाबाद - भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचे 84 वर्षांचे आजोबा संतोक सिंह बुमराह शुक्रवारपासून बेपत्ता आहेत. बुमराहला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते उत्तराखंडहून अहमदाबादला आले होते. संतोक सिंह यांची मुलगी राजेंदर कौर यांनी ते हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. संतोक सिंह यांना जसप्रीत बुमराहला भेटू दिले नाही. त्यानंतर ते बेपत्ता झाले, असे तक्रारीत म्हटले आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, संतोक सिंह त्यांच्या नातवाला म्हणजेच जसप्रीतला भेटायला उत्तराखंडहून अहमदाबाद येथे आले होते. जसप्रीत याचा वाढदिवस 5 डिसेंबर रोजी असतो. पण, त्यादिवशी त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे ते जसप्रीतच्या आईच्या शाळेत तिला भेटायला गेले होते. मात्र, जसप्रीतच्या आईने त्यांची भेट घ्यायला नकार दिला होता. शिवाय, आमच्या कुटुंबाशी संपर्क करू नका असंही सांगितलं होतं. त्यानंतर संतोक यांनी 8 डिसेंबर रोजी आपल्या दुसऱ्या मुलाशी संपर्क करून आपल्याला जसप्रीतला भेटायची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. संतोक सिंह 1 डिसेंबरला मुलीच्या घरी पोहोचले. तेथे त्यांनी नातू जसप्रीत बुमराहला भेटायचे आहे, असे सांगितले; पण भेट होऊ शकली नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. ते जसप्रीतच्या आईची भेट घेण्यासाठी शाळेतही गेले. पण त्यांनीही भेटण्यास नकार दिला. बुमराहचा मोबाइल क्रमांकही दिला नाही, असे राजेंदर कौर यांनी सांगितले.