नवी दिल्ली : जेव्हा मी गोलंदाजी करत होतो, तेव्हाची तुलना केल्यास जसप्रीत बुमराह हा माझ्यापेक्षा हजार पटींनी चांगला गोलंदाज आहे, असे भारताचे पहिले विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी म्हटले आहे. बुमराह सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात शानदार कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत २३ षटकांत ११ गडी बाद केले आहेत. कपिल देव यांनी सांगितले की, बुमराह माझ्यापेक्षा हजार पटींनी चांगला गोलंदाज आहे. हा युवा गोलंदाज माझ्यापेक्षा सरस आहे. आमच्याकडे खूप अनुभव होता; पण हा खेळाडू उत्तम आहे.
बुमराहला सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाज मानले जात आहे. भारतासाठी २६ कसोटी सामने खेळलेल्या या गोलंदाजाने १५९ गडी बाद केले आहेत. ८९ वनडेमध्ये १४९ आणि ६८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने ८५ विकेट घेतल्या आहेत. कपिल यांनी आपल्या कारकिर्दीचा समारोप ४३४ कसोटी बळींच्या विश्वविक्रमासह केला होता. त्यांना आतापर्यंतच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानले जाते. त्यांनी २५३ एकदिवसीय बळीही घेतले आहेत. भारताला १९८३ मध्ये पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या ६५ वर्षीय कपिल यांनी राष्ट्रीय संघाच्या तंदुरुस्तीचेही कौतुक केले. ते म्हणाले की, सर्वच खेळाडू उत्कृष्ट, तंदुरुस्त, मेहनती आणि शानदार आहेत.
कपिल देव म्हणाले की, टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी वैयक्तिक प्रतिभा नव्हे, तर सांघिक कामगिरीच महत्त्वाची भूमिका बजावेल. प्रत्येक खेळाडूने योगदान दिले तरच भारताचा जगज्जेतेपदाचा दुष्काळ संपवता येईल. कपिल देव यांनी विशेष मुलाखतीत सांगितले की, आपण केवळ रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांच्यावरच चर्चा का करतो? स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवून खेळणे गरजेचे आहे. जर आपण केवळ बुमराह आणि अर्शदीप यांच्यावरच अवलंबून राहिलो तर आपल्यासाठी विजय मिळवणे कठीण होईल.
....त्यामुळेच १९८३ ला ठरलो जगज्जेतेकपिल देव म्हणाले की, १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघात चांगली कामगिरी करणारा मी एकटा खेळाडू नव्हतो. राॅजर बिन्नी, मोहिंदर अमरनाथ, कीर्ती आझाद, यशपाल शर्मा या सर्वांनी संघाला विजय मिळवून देणारी कामगिरी केली होती. तुम्ही एका खेळाडूवर अवलंबून राहण्यास सुरुवात केली तर याचा अर्थ तुम्ही स्पर्धा जिंकू शकणार नाही.
भारतीय संघाला शुभेच्छा कपिल म्हणाले की, भारतीय संघाला माझ्या शुभेच्छा आहेत. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत जशी कामगिरी केली आहे, तशीच पुढे करतील, अशी आशा आहे. एखादा दिवस खराब ठरला आणि ते स्पर्धेबाहेर झाले असे व्हायला नको. खेळाडू चांगले खेळत आहेत आणि खेळाचा आनंद लुटत आहेत. त्यांच्या कामगिरीला सलाम.