नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. या स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर झाला असून आगामी टी-२० विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) संघातील खेळाडूंची चाचपणी केली जात आहे. आशिया चषकात भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) पुढच्या आठवड्यात टी-२० विश्वचषकासाठी भारताचा संघ जाहीर करणार आहे. संघाच्या घोषणेपूर्वी जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल या स्टार गोलंदाजांच्या फिटनेसबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, दोन्हीही दुखापतग्रस्त गोलंदाजांची फिटनेस चाचणी क्लिअर असल्याची माहिती बंगळुरूमधील नॅशनल अकादमीत करण्यात आलेल्या फिटनेस टेस्टमधून समोर आली आहे. त्यामुळे आता ते भारतीय संघात खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. इनसाइडस्पोर्टच्या अहवालानुसार, संघनिवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने शनिवारी जुलै महिन्यात इंग्लंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलेल्या जसप्रीत बुमराहच्या फिटनेसची तपासणी केली. लक्षणीय बाब म्हणजे बुमराह आणि हर्षल दोघांचीही फिटनेस चाचणी क्लिअर असल्याची माहिती समोर आली आहे.
जसप्रीत बुमराह टी-२० विश्वचषकासाठी सज्जवेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दोघांचीही फिटनेस चाचणी क्लिअर आली आहे. त्या दोघांनी शनिवारी नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस चाचणी केली आणि बीसीसीआयचे वैद्यकीय कर्मचारी यांनी त्यांच्या या अहवालावर समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषक तसेच ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची ताकद आणखी वाढणार आहे.
आशिया चषकात कमकुवत गोलंदाजीचा भारतीय संघाला मोठा फटका बसला होता. भारताने आपल्या सलामीच्या सामन्यात आणि हॉंगकॉंगकविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवून सुपर-४ मध्ये प्रवेश केला होता. मात्र सुपर-४ मधील पहिल्या दोन्ही सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. भारतीय संघाने या स्पर्धेत आवेश खान, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग या तीन वेगवान गोलंदाजाचा प्रयोग केला होता. मात्र तो पूर्णपणे निष्फळ ठरला. पाकिस्तानविरूद्धच्या सुपर-४ मधील सामन्यात १७४ धावांचा बचाव न करता आल्यामुळे भारताला आशिया चषकातून बाहेर व्हावे लागले. यंदाच्या आशिया चषकाचा अंतिम सामना आज होणार असून यजमान श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये किताबासाठी लढत होणार आहे.