Join us  

जसप्रीत बुमराह, विराट कोहलीला मिळणार विश्रांती; बीसीसीआयचा निर्णय

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मर्यादित षटकांच्या मालिकेत विश्रांती देण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 4:43 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मर्यादित षटकांच्या मालिकेत विश्रांती देण्यात येणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ कॅरेबियन आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. तेथे संघ दोन कसोटी, तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेत कोहली व बुमराह यांना विश्रांती देण्याचा विचार सुरू आहे. आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत या दोन कसोटींचा समावेश आहे. 

''तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत कोहली व बुमराह यांना विश्रांती दिली जाईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून कोहली सातत्यानं खेळत आहे आणि बुमराहवरील खेळाचा तणाव लक्षात घेता संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी हे दोघेही संघात सहभागी होतील,'' अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिली.

कोहली व बुमराहसह अन्य काही खेळाडूंनाही विश्रांती देण्याचा विचार सुरू आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडियन प्रीमिअर लीग आणि त्यानंतर वर्ल्ड कप अशा सातत्याने स्पर्धा झाल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंवरील ताण लक्षात घेता काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. भारतीय संघाने अंतिम स्पर्धेत प्रवेश केल्यास त्यांना 14 जुलैपर्यंत खेळावे लागेल. त्यामुळे संघातील प्रमुख फलंदाज व गोलंदाजांना पुढील दौऱ्यासाठी विश्रांती देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेला 22 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप संघातील खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळत आहे. कोहली आणि बुमराह तीन दिवसांच्या सराव सामन्यापूर्वी ( 17-19 ऑगस्ट) संघात सहभागी होतील. या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी या खेळाडूंना A संघासोबत विंडीज दौऱ्यावर पाठवण्यात येणार आहे. 3 ते 6 ऑगस्ट या कालावधीत तीन ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत आणि आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप लक्षात घेता भारतीय संघात काही खेळाडूंना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. 8 ते 14 या कालावधीत तीन वन डे सामने होतील.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019जसप्रित बुमराहविराट कोहलीबीसीसीआयवेस्ट इंडिज