Join us  

"मी परत येतोय..."; 'टीम इंडिया'च्या चाहत्यांना जसप्रीत बुमराहने दिली खुशखबर!

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे सुमारे वर्षभर क्रिकेटपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 3:29 PM

Open in App

Jasprit Bumrah Comeback: भारतीय क्रिकेट संघाचे चाहते ज्या खेळाडूच्या फिटनेस अपडेटची दीर्घकाळ वाट पाहत होते, तो वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अखेर पुनरागमनाच्या वाटेवर आहे. त्याने स्वतःच त्याच्या पुनरागमनाबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून सर्वात महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. पाठीच्या मणक्याच्या समस्येमुळे बुमराह गेल्या वर्षी सप्टेंबरपासून सतत क्रिकेटपासून दूर आहे. जसप्रीत बुमराहने ही समस्या दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. बराच काळ त्याच्या पुनरागमनाबाबत चर्चा होती. बुमराह आशिया चषकातून पुनरागमन करू शकतो, अशी शक्यता आता वर्तवली जात असून त्याच दरम्यान त्याने स्वतःच त्याच्या पुनरागमनाबाबत एक मोठे अपडेट दिले आहे.

बुमराहने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अनेक फोटो आहेत, ज्यात तो गोलंदाजी करताना दिसत आहे. या पोस्टसह बुमराहने लिहिले की, मी मैदानात परतत आहे. यावरून हे स्पष्टपणे समजू शकते की बुमराहचे पुनरागमन आयर्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत होऊ शकते. पाहा बुमराहची पोस्ट-

विश्वचषकात भारतीय संघाच्या गोलंदाजीला बळ मिळेल

जर बुमराह आयर्लंडविरुद्ध मैदानात परतला तर आशिया कपदरम्यान संघ व्यवस्थापनाला त्याच्या फिटनेसची योग्य चाचणी घेण्याची संधी मिळेल. अशा परिस्थितीत बुमराहने आशिया चषकात चांगली कामगिरी केली तर वनडे विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला नक्कीच मोठा दिलासा मिळेल. यामुळे संघाचा वेगवान गोलंदाजी विभाग मजबूत होणार आहे, ज्यामध्ये मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज आधीच उपस्थित आहेत.

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघएशिया कप 2022
Open in App