आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) मंगळवारी डिसेंबर २०२४ महिन्यातील 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार विजेत्याची घोषणा करण्यात आली. भारताचा स्टार जलगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पुरुष गटातील महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिला जाणारा आयसीसीचा पुरस्कार पटकवला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सही या शर्यतीत होता. पण त्याला धोबीपछाड देत जसप्रीत बुमराहनं बाजी मारलीये. जसप्रीत बुमराहनं दुसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फक्त अन् फक्त बुमराहची हवा
बुमराहनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पेश करत अनेक विक्रमांची नोंद केली होती. डिसेंबरमध्ये तीन कसोटी सामन्यात १४.२२ च्या सरासरानं २२ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यात प्रत्येकी ९-९ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पाच कसोटी सामन्यात एकूण ३२ विकेट्स घेतल्या होत्या. पाठीच्या दुखापतीमुळे सिडनी कसोटीतील दुसऱ्या डावात तो मैदानात उतरला नव्हता. तो बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी झालेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूही ठरला होता.
बुमराहनं या दोघांना मागे टाकत मारली बाजी
जसप्रीत बुमराहशिवाय ऑस्ट्रेलियन कॅप्टन आणि जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स याच्यासह दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेन पेटरसन हा डिसेंबरमधील सर्वोत्तम खेळाडूच्या शर्यतीत होता. पॅट कमिन्स याने तीन कसोटी सामन्यात १७.६४ च्या सरासरीने १७ विकेट्स आपल्या नावे केल्या होत्या. पेटरसन याने श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या विरुद्धच्या कसोटी मालिकेत १६.९२ च्या सरासरीने १३ विकेट्स घेतल्या होत्या. या दोघांना मागे टाकत बुमराहनं बाजी मारली.
पुरस्कार मिळाल्यावर काय म्हणाला बुमराह?
सर्वोत्तम कामगिरीसाठी ICC चा पुरस्कार मिळाल्यावर बुमराहनं प्रतिक्रियाही दिलीये. तो म्हणाला की, डिसेंबर महिन्यातील 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथट पुरस्काराने सन्मानित होणं आनंददायी आहे. वैयक्तिक पुरस्कारासाठी निवड होते तो क्षण नेहमीच खास असतो. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धा ही सर्वात कठीण आव्हानात्मक स्पर्धेपैकी एक होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर देशाच प्रतिनिधीत्व करणं अभिमानास्पद गोष्ट होती. बुमराहशिवाय महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या एनाबेल सदरलँड हिला 'आयसीसी महिला प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्काराने गौरवण्यात आले.