भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) कसोटी गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. ICC च्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर १ स्थान पटकावणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिला आशियाई जलदगती गोलंदाज ठरला आहेय इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत जसप्रीतने ९ विकेट्स घेऊन सामना गाजवला आणि त्यामुळेच त्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने १०६ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरी केली. या सामन्यात जसप्रीतने दोन्ही डावांत मिळून ९१ धावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तो आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर वन गोलंदाज झाला आणि कसोटीत अव्वल स्थानावर विराजमान होणारा तो भारताचा पहिला जलदगती गोलंदाज ठरला आहे.
९ विकेट्स घेणाऱ्या जसप्रीतला दुसऱ्या कसोटीत मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला गेला होता आणि त्याने आयसीसी क्रमवारीत तीन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान पटकावले. आर अश्विनची दोन स्थानांनी घसरण झाली आणि तो पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. मागील वर्षी मार्च महिन्यापासून अश्विन अव्वल स्थानावर होता, परंतु इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याला तीन विकेट घेता आल्या होत्या. त्यामुळे त्याची घसरण झाली, दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा दुसऱ्या स्थानावर कायम आहे. यापूर्वी जसप्रीत कसोटी क्रमवारीत ३ स्थानांच्या वर कधीच सरकला नव्हता.