Jasprit Bumrah bowling action controversy, IND vs AUS 4th Test MGC: टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराहने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजीला चांगलाच चाप लावून ठेवलाय. बुमराहने तीन सामन्यांत २०पेक्षा अधिक बळी घेतले आहेत. सध्या जगातील नंबर १ कसोटी गोलंदाज म्हणून बुमराहचेच नाव घेतले जाते. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनादेखील बुमराहची गोलंदाजी खेळायला खूप त्रास होतो. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाजदेखील बुमराहच्या गोलंदाजीचे चाहते आहेत. मात्र, मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बुमराहची गोलंदाजीची पद्धत क्रिकेटच्या नियमांत बसणारी नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बुमराहवर बेकायदेशीर बॉलिंग ॲक्शनचा आरोप
मेलबर्न कसोटीपूर्वी बुमराहच्या गोलंदाजीच्या ॲक्शनवरून वाद सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे अनुभवी क्रिकेट ब्रॉडकास्टर इयान मॉरिसने त्याच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याने त्याच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, भारतीय वेगवान गोलंदाज बुमराहच्या गोलंदाजी शैलीवर कोणीही प्रश्न का विचारला नाही? हे आजकाल राजकीयदृष्ट्या योग्य नाही का? तो चेंडू फेकतोय असे मी म्हणत नाही पण चेंडू हातून सोडण्याच्या वेळच्या हाताच्या स्थितीचे तरी विश्लेषण केले पाहिजे. बुमराह चेंडू टाकताना त्याच्या हाताची स्थिती बारकाईने पाहिली पाहिजे, असे त्यांनी सुचवले.
याआधीही बुमराहच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. बुमराहच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी बुमराहला त्याच्या अनोख्या शैलीमुळे अशा गोष्टींना सामोरे जावे लागले होते. पण त्यात त्याची पद्धत योग्यच असल्याचे निष्पन्न झाले होते. या मालिकेत बुमराहने पर्थ कसोटीत पहिल्या डावात पाच विकेट घेत ऑस्ट्रेलियाला १०४ धावांत गुंडाळले. तेव्हा सोशल मीडियावर त्याच्या गोलंदाजीच्या ॲक्शनबाबत चर्चा रंगली होती. त्यामुळे घाबरलेल्या ऑस्ट्रेलियाने आता 'रडीचा डाव' खेळण्याची सुरुवात केल्याची चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगली आहे.