Jasprit Bumrah On Rohit-Hardik MI Captaincy : आयपीएल २०२४ चा हंगाम म्हणजे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट स्वप्नच. नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रोल करण्याची चाहत्यांनी एकही संधी सोडली नाही. रोहित शर्माला वगळून हार्दिकला मुंबईचा कर्णधार बनवल्याने चाहत्यांनी रोष व्यक्त केला. हार्दिक विरूद्ध रोहित असे चित्र तयार करण्यात आले. याशिवाय मुंबईच्या संघात दोन गट पडले असल्याचे अनेकदा निदर्शनास आले. आता याबद्दल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भाष्य केले आहे. मुंबईने हार्दिकला गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीकडून घेऊन आपल्या संघात सामील केले होते. पण हार्दिकला कर्णधार बनवल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती.
हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा दोघेही एकमेकांना सहकार्य करत असल्याचे बुमराहने सांगितले. हार्दिकला सर्व सहकारी खेळाडू पाठिंबा देत होते. नवनिर्वाचित कर्णधाराच्या नेतृत्वात संघ कशी चांगली कामगिरी करेल यावर चर्चा सुरू होती. पण, काही गोष्टी आमच्या नियंत्रणाच्या बाहेर होत्या, त्या जगजाहीर असून कोणीच यावर तोडगा काढू शकले नाही.
...अन् सर्वकाही बदललं - बुमराह
जसप्रीत बुमराह पुढे म्हणाला की, एक संघ म्हणून आम्ही कोणत्याच एका खेळाडूकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आम्ही तिथे एकमेकांसाठी उभे असतो. संघातील सर्वच खेळाडू एकमेकांची मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. मी हार्दिकसोबत खूप क्रिकेट खेळले आहे. तेव्हा दोघेही खूप युवा होतो असे मी म्हणेन. आम्ही एकत्र होतो आणि गरज पडेल तेव्हा एकमेकांना मदत करत होतो, असेही बुमराहने सांगितले. तो इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
तसेच कठीण परिस्थितीत काही अंतर्गत गोष्टी मदत करत असतात. आम्ही संघ म्हणून याचा प्रचार करत नाही. आम्ही एक संघ म्हणून त्याच्यासोबत (हार्दिक पांड्या) होतो. आम्ही त्याच्याशी बोलत होतो. त्याचे कुटुंब नेहमी तिथे असायचे. काही गोष्टी नियंत्रणाबाहेर आहेत हे मान्य करावे लागेल. पण, जेव्हा आम्ही विश्वचषक जिंकला तेव्हा सर्वकाही बदलले, असे बुमराहने आणखी सांगितले.
Web Title: Jasprit Bumrah clarified that there was no dispute between Hardik Pandya and Rohit Sharma in the Mumbai Indians team in IPL 2024
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.