इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या प्रमुख गोलंदाजांनी बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका गाजवली. मर्यादित षटकांच्या सामन्यातही भारतीय संघात अनेक पर्याय आहेत आणि भुवनेश्वर कुमार फिट झाल्यामुळे त्याला अनुभवाची जोड मिळाली आहे. पण, सर्वांचे लक्ष लागले आहे ते जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाकडे. 2019मध्ये त्याचे पुनरागमन होणार नव्हतेच, परंतु ते 2020च्या सुरूवातीला टीम इंडियात परतेल, असा विश्वास होता. पण, तो अजूनही पूर्णपणे बरा झाला नसून त्याचे पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या वक्तव्यानं तसा सूचक इशारा मिळत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेला सुरू होण्यासाठी एक आठवडा शिल्लक असताना बुमराहनं पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे माघार घेतली. त्यानंतर तो उपचारासाठी लंडनमध्ये गेला होता, पण त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागणार नसल्याचा दिलासा चाहत्यांना मिळाला होता. त्यानंतर मायदेशात परतलेला बुमराह तंदुरुस्तीसाठी कसून सराव करत आहे. बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून कमबॅक करेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. ही मालिका जानेवारीत होणार आहे. पण, प्रसाद यांच्या माहितीनुसार बुमराहचं पुनरागमन लांबणीवर पडले आहे.
डिसेंबरमध्ये विंडीजविरुद्धच्या मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. यापैकी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्याविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत बुमराह खेळणार नसल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे आणि तेथे दोन कसोटी, पाच ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामने खेळवण्यात येणार आहेत. बुमराह या दौऱ्यातून टीम इंडियात कमबॅक करेल, असा विश्वास प्रसाद यांनी बोलून दाखवला.
Web Title: Jasprit Bumrah Expected To Be Back For New Zealand Tour, MSK Prasad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.