Join us  

Ind vs SA 1st Test: बुमराहने परदेशी पिचवर रचला इतिहास; 'असा' पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला. त्याने परदेशातील खेळपट्ट्यांवर विक्रम रचत अनेक दिग्गज गोलंदाजांना मागे टाकलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 2:45 PM

Open in App

IND vs SA 1st Test, Jasprit Bumrah Record : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पहिल्या कसोटी सामन्यात एका दमदार विक्रमाला गवसणी घातली. भारताने पहिल्या डावात १३० धावांची आघाडी घेतल्यानंतर त्यांचा दुसरा डाव १७४ धावांत आटोपला. त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला ३०५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मद शमी आणि सिराज यांनी पहिल्या दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या टप्प्यात जसप्रीत बुमराहने झटपट दोन त्रिफळे उडवले. त्याच्या या कामगिरीसोबतच एक मोठा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.

जसप्रीत बुमराहने आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात दोन बळी घेतल्यानंतर परदेशात त्याने १०० बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा बुमराह ११वा भारतीय ठरला. त्यासोबतच बुमराह हा परदेशी खेळपट्ट्यांवर सर्वात जलद १०० बळी मिळवणारा भारतीय गोलंदाज ठरला. बुमराहने आपल्या २२व्या कसोटीत हा पराक्रम करून दाखवला. जसप्रीत बुमराहने भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू बी एस चंद्रशेखर यांचा विक्रम मोडला. त्यांनी २५ कसोटी सामन्यांमध्ये भारताबाहेर बळींचे शतक पूर्ण केलं होतं.

बुमराहने दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियनच्या मैदानावर कसोटी खेळताना हा पराक्रम केला. त्याने रसी वॅन डर डुसेन याला आपला १००वा बळी केला. दुसऱ्या डावात बुमराहचा हा पहिलाच बळी ठरला. दोन गडी बाद झाल्यावर कर्णधार डीन एल्गर आणि वॅन डर डुसेन चांगली फलंदाजी करत भक्कम भागीदारी करण्याच्या दृष्टीने खेळत होते. त्यावेळी बुमराहने आफ्रिकेला हा मोठा धक्का दिला.

त्या विकेटनंतर काही मिनिटांचाच खेळ शिल्लक असल्याने आफ्रिकेने नाईट वॉचमन केशव महाराजला फलंदाजीसाठी पाठवलं. पण बुमराहने धारदार यॉर्कर टाकत त्याला माघारी धाडलं.

त्यासोबतच चौथ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला.

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाजसप्रित बुमराहलोकेश राहुलविराट कोहली
Open in App