सलामीच्या सामन्यातील पराभवानंतर भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या सामन्यातून लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा बाहेर झाले आहेत. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंडने विजयी सलामी दिली. पहिल्या डावात चमकदार कामगिरी करून आघाडी मिळवणाऱ्या यजमान भारताला शेवट गोड करता आला नाही. सलामीच्या सामन्यात भारतीय संघाचा धक्कादायकरित्या पराभव झाला. पहिल्या दोन दिवसांत सामन्यावर मजबूत पकड असलेला भारतीय संघ पुढील दोन दिवसांत थेट पराभूत झाला.
जड्डू आणि राहुलच्या जागी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार आणि सर्फराज खान यांची टीम इंडियात वर्णी लागली आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने २८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया मालिकेत ०-१ ने पिछाडीवर गेली. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतही भारताला मोठा फटका बसला. एवढेच नाही तर आता आयसीसीने भारताला आणखी एक धक्का दिला आहे.
ICC ची बुमराहवर कारवाई! कारण भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर कारवाई करण्यात आली आहे. बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. हा प्रकार इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील ८१ व्या षटकात घडला. बुमराहने जाणूनबुजून ओली पोपच्या मार्गात पाऊल ठेवले होते. पोप धाव घेत असताना बुमराहने तिथे आडकाठी केली होती. स्टार गोलंदाज बुमराहला आयसीसीने फटकारले आहे. पण त्याला दंड ठोठावण्यात आला नाही, कारण २४ महिन्यांतील हे त्याचे पहिलेच असे कृत्य आहे. मात्र, आयसीसीने कारवाई करत त्याच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला आहे. मैदानावरील पंच पॉल रायफल, ख्रिस गॅफनी, तिसरे पंच मारेस इरास्मस आणि चौथे पंच रोहन पंडित यांनी हा आरोप केला आहे.
दुसऱ्या सामन्यांसाठी बदललेला भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, सर्फराज खान, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद यादव. , मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार आणि आवेश खान.