Jasprit Bumrah News : जसप्रीत बुमराह म्हणजे भल्या भल्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ. बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आला आहे. २०२४ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकात बुमराहने टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली होती. बुमराहसमोर सर्वोत्तम फलंदाजही गुडघे टेकताना दिसले आहेत. पण, घातक फलंदाजांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या बुमराहला कोणत्या फलंदाजाची भीती वाटते या प्रश्नावर मात्र त्याने सावध उत्तर दिले.
भारताचा स्टार गोलंदाज बुमराह चेन्नईतील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याला एक कठीण प्रश्न विचारण्यात आला. बुमराहला विचारण्यात आले की, कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करणे तुला सर्वात कठीण वाटते? यावर बुमराहने सावध उत्तर देत सर्वांची मनं जिंकली.
बुमराहचे भारी उत्तर मला या प्रश्नाचे एक चांगले उत्तर द्यायचे आहे. खरी गोष्ट अशी आहे की, माझ्याविरुद्ध कोणी आक्रमक व्हावे असे मला वाटत नाही. मी सर्वांचाच आदर करतो, पण मनातल्या मनात मी स्वतःला सांगतो की जर मी माझे काम चोख केले तर मला थांबवणारे जगात कोणीच नाही. मी प्रतिस्पर्ध्यापेक्षा स्वतःवर जास्त लक्ष देतो. माझे सर्व गोष्टींवर नियंत्रण आहे आणि जर मी स्वतःला सर्वोत्तम संधी दिली तर बाकी सर्व काही ठीक होईल, असे जसप्रीत बुमराहने सांगितले.
दरम्यान, विश्वचषकानंतर जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. तो आता थेट बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसण्याची शक्यता आहे. ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वे आणि श्रीलंकेचा दौरा केला. दोन्ही दौऱ्यांवर बुमराहची अनुपस्थिती होती.