Asia Cup 2023 - भारतीय संघाची आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुरुवात काही खास झाली नाही. आघाडीचे चार फलंदाज अपयशी ठरले, बॅटींग डेफ्टसाठी रवींद्र जडेजा व शार्दूल ठाकूर यांना खेळवले, परंतु तेही फेल गेले... इशान किशन व हार्दिक पांड्या यांची फटकेबाजीने मधळी फळी सक्षम असल्याचे दाखवून दिले. पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे ड्रॉ राहिल्याने आता नेपाळविरुद्धच्या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पण, त्या सामन्यात जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे. जसप्रीत तातडीने रविवारी कोलंबो येथून मुंबईसाठी रवाना झाला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जसप्रीतने १६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. आयर्लंड दौऱ्यावरून त्याने बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ती मालिका जिंकली होती. त्यानंतर वन डे संघात त्याचे पुनरागमन झाले. गोलंदाजीची संधी मिळाली नसली तरी जसप्रीतने फलंदाजीत कमाल करून दाखवली. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने ही भारतीय चाहत्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. पण, जसप्रीत रविवारी वैयक्तिक कारणामुळे मुंबईच्या दिशेने निघाला. तो नेपाळविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही, परंतु Super 4 साठी तो पुन्हा श्रीलंकेत येणार आहे.
जसप्रीतच्या गैरहजेरीत मोहम्मद शमी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल. पाकिस्तानविरुद्ध त्याच्याजागी शार्दूलला संधी दिली गेली होती. India vs Nepal सामना ४ सप्टेंबरला म्हणजेच उद्या होणार आहे. त्यानंतर सुपर ४ च्या लढती होतील. जसप्रीतची प्रकृती यामागचं कारण नाही, तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्याने BCCI च्या परवानगीने मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. त्याची पत्नी संजना गणेसन बाळाला जन्म देणार असल्याने जसप्रीत मुंबईला निघाला असल्याचे वृत्त काहींनी दिले आहे.