रायपूर : सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 21 जानेवारी रोजी रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून भारतीय संघाने नववर्षात सलग दुसऱ्या वन डे मालिकेवर कब्जा केला. न्यूझीलंडने दिलेल्या 109 धावांच्या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाने सहज केला आणि मालिका आपल्या नावावर केली.
दरम्यान, दुसऱ्या सामन्यात मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 बळी घेतले. ब्रेसव्हेलची विकेट हे शमीचे सर्वात मोठे यश होते, कारण ब्रेसव्हेलने पहिल्या वन डे सामन्यात किवी संघाला जवळपास विजयाच्या जवळ आणले होते. भारताने पहिली वनडे 12 धावांनी जिंकली असली तरी दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा डाव 108 धावांत गुंडाळला आणि त्यानंतर भारताने 20.1 षटकांत 8 विकेट गमावून लक्ष्य गाठले.
खेळ कोणासाठी थांबत नाही - मोहम्मद शमी
विजयानंतर शमीने त्याचा सहकारी गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबद्दल भाष्य केले. सामन्यानंतर शमीला विचारण्यात आले की, तो बुमराहला मिस करत आहे की नाही? या प्रश्नाला उत्तर देताना शमी म्हणाला, "बुमराह हा एक मोठा खेळाडू आहे, पण क्रिकेटचा खेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. चांगल्या खेळाडूची कमतरता नेहमीच भासत असते, पण एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर खेळ थांबला पाहिजे असे नाही. बुमराहची नक्कीच उणीव आहे, तो चांगला गोलंदाज आहे." खरं तर मागील मोठ्या कालावधीपासून जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे.
भारताची विजयी आघाडी
रोहित शर्मा अँड कंपनीने न्यूझीलंडचा दुसऱ्या वन डे सामन्यात आठ गडी राखून पराभव करून किवीविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. या सामन्यात मोहम्मद शमीने तीन, हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ 34.3 षटकात 108 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने लक्ष्याचा पाठलाग आठ गडी आणि 29.5 षटके राखून केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Jasprit Bumrah is a great player but the game of cricket does not stop for anyone, says Mohammed Shami
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.