Japsrit Bumrah : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ला ३१ मार्चपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा ३१ मार्च ते २८ मे या कालावधीत होणार आहे. या मोसमातील पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अहमदाबादमध्ये होणार आहे. अनफिट राहिल्यामुळे टीम इंडियातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे आयपीएल २०२३ मधून पुनरागमन अपेक्षित आहे.
क्रिकेटसाठी महत्त्वाचे वर्ष असल्याने बीसीसीआयला जसप्रीत बुमराहला खेळवण्याची घाई करायची नाही. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल, आशिया चषक आणि वन डे वर्ल्ड कप यासारख्या मोठ्या स्पर्धा यावर्षी होणार असल्याने, बीसीसीआयला जसप्रीत पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री करायची आहे. कारण बुमराहने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपप्रमाणे या वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला मुकू नये असे बीसीसीआयला वाटतेय.
क्रिकेटच्या या व्यग्र वेळापत्रकात बीसीसीआय आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर लक्ष ठेवणार आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू व समालोचक आकाश चोप्रा संतापला आहे. तो म्हणतो, ''जसप्रीत बुमराहबद्दल शंका असेल तर त्याला आयपीएलमध्ये खेळू देऊ नये. कारण आयपीएलपेक्षा देशासाठी त्याचे खेळणे महत्त्वाचे आहे. तुम्ही प्रथम भारतीय खेळाडू आहात आणि दुसऱ्या क्रमांकावर फ्रँचायझी क्रिकेटर आहात. जर बुमराहला काही अस्वस्थता वाटत असेल, तर बीसीसीआयला पुढे येऊन फ्रँचायझींना सांगावे लागेल की आम्ही त्याला सोडणार नाही. जोफ्रा आर्चरसोबत ७ सामने तो खेळला नाही तर जग संपणार नाही. बीसीसीआयला त्याच्यावर ओव्हरलोड होणार नाही हे पाहावे लागेल."
आकाश चोप्रा बुमराहच्या फिटनेस आणि खेळण्याच्या भविष्याबद्दल पुढे म्हणाला की, "जर तो तंदुरुस्त असेल तर रवींद्र जडेजाप्रमाणे त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलपूर्वी इराणी ट्रॉफी आणि कौंटी क्रिकेटमध्ये खेळले पाहिजे. त्यामुळे त्याचा फिटनेस कळू शकेल आणि परिस्थिती स्पष्ट होईल. आयपीएलला अजून एक महिना बाकी आहे आणि तो सर्व सामने खेळणार की नाही हे देखील आम्हाला माहीत नाही. जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनललाही तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे सध्या त्याचे त्याच्या फिटनेसबद्दल काहीही सांगणे खूप घाई आहे.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"