Jasprit Bumrah Morne Morkel, IND vs AUS 1st Test: भारतीय कसोटी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, तिथे त्यांना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणार आहे. मात्र हा सामना भारतीय संघासाठी सोपा असणार नाही. कारण भारतीय संघ पर्थ कसोटीत कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीशिवाय मैदानात उतरणार आहे. अशा परिस्थितीत संघाचा कर्णधार कोण असेल यावर बरीच चर्चा रंगली होती. पण आज गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल याच्या पत्रकार परिषदेत या चर्चांना पूर्णविराम मिळाला. जसप्रीत बुमराह हा जन्मजात लीडर आहे, तो संघाचे संयमाने नेतृत्व करू शकतो, असे सूचक विधान त्याने केले.
"जसप्रीत बुमराह हा असा खेळाडू आहे, जो कधीही संकटात खचत नाही आणि संघाचे नेतृत्व करायला कधीही तयार असतो. त्याने आधीही कर्णधारपद भूषवलं आहे. तो या भूमिकेत यशस्वी राहिलेला आहे. ड्रेसिंग रूममध्ये तो सर्व खेळाडूंशी खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधतो. संघावर संकट आलं तर तो स्वत: सर्वात पुढे उभा राहून त्या संकटाचा सामना करतो. गोलंदाजीत त्याने ही कमाल अनेकदा दाखवली आहे. मला विश्वास आहे की, युवा पिढी त्याच्याकडून नक्कीच चांगल्या गोष्टी शिकेल", अशा शब्दांत मॉर्ने मॉर्कलने कर्णधारपदाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
"बुमराहसाठी ऑस्ट्रेलियात नेतृत्व करणे हे चांगले आव्हान ठरेल. भारताच्या संघात विराट कोहली, केएल राहुल यांच्यासारखे कर्णधारपदाचा अनुभव असलेले खेळाडू आहेत. त्यांच्या नेतृत्वाचा अनुभव बुमराहला नक्कीच मदतीचा ठरेल. जेव्हा बुमराह गोलंदाजी करत असतो, तेव्हा भारताचा संघ शांत आणि संयमी असतो कारण तो संघाला कायमच चांगले चित्र दाखवतो. निव्वळ कर्णधापदाबद्दल बोलायचे झाले तर बुमराह हा जन्मजात 'लीडर' आहे," अशा शब्दांत मॉर्कलने बुमराहची स्तुती केली.
जसप्रीत बुमराहची ऑस्ट्रेलियन भूमीवरील कामगिरी उल्लेखनीय आहे. त्याने आतापर्यंत सात कसोटी सामन्यांत ३२ बळी घेतले आहेत. त्याच्या सर्वोत्तम कामगिरीत त्याने एका डावात ६ बळी घेतलेले आहेत.
मोहम्मद शमी कधी परतणार?
"आम्ही मोहम्मद शमीच्या आरोग्यावर आणि तंदुरुस्तीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. आम्हाला त्याच्या आरोग्याचा योग्य अंदाज घ्यावा लागेल. थोडासा संयम बाळगण्याची गरज आहे. आमची वैद्यकीय टीम त्याला योग्य ते मार्गदर्शन करत आहे, असे मॉर्कल म्हणाला.