दुखापतीमुळे टी २० वर्ल्ड कपला मुकलेल्या जसप्रित बुमराहने टीम इंडियासाठी महत्वाची बातमी आणली आहे. वर्ल्डकप असेल की न्यूझीलंडचा दौरा, टीम इंडियाला बुमराहची कमी नेहमीच भासली होती. आजही मोठी धावसंख्या उभारूनही भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. गोलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. आता बुमराहने व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या व्हिडीओत बुमराह वर्कआऊट करताना दिसत आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखण्याचा त्रास होत होता. त्यामुळे बुमराहला टी-२० विश्वचषकातूनही बाहेर व्हावे लागले होते. न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठीही त्याची निवड झालेली नव्हती. बुमराहशिवाय रवींद्र जडेजाही दुखापतीमुळे वर्ल्ड कपमध्ये खेळू शकला नव्हता.
बुमराहने त्याच्या फिटनेसचे संकेत दिले आहेत. बुमराह पुढील वर्षी टीम इंडियात खेळू शकतो, अशी आशा आता त्याच्या फॅन्सना वाटू लागली आहे. एकदिवसीय विश्वचषकापूर्वी बुमराह काही मालिकाही खेळू शकेल. भारतीय संघाला पुढील वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात मालिका खेळायची आहे. यातही बुमराहची निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बुमराहने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो इनडोअर आणि आउटडोअर अशा दोन्ही ठिकाणी वर्कआउट करताना दिसत आहे. यादरम्यान तो धावतानाही दिसला आहे. 28 वर्षीय वेगवान गोलंदाजाने 30 कसोटी सामने खेळले आहेत ज्यात त्याने 21.99 च्या सरासरीने एकूण 128 विकेट्स घेतल्या आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एकूण 132 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, यात 191 विकेट घेतले आहेत.