नवरात्रीमुळे भारत-पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरएवजी १४ तारखेला खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत असताना बीसीसीआयचे सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. जय शाह यांनी २७ जुलै रोजी घोषित केले की, वन डे वर्ल्ड कप २०२३ च्या वेळापत्रकात बदल केले जातील. शहा यांनी स्पष्ट केले की हे बदल केवळ भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी नसतील. हा सामना १५ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद येथे होणार होता. बीसीसीआयला वेळापत्रक बदलण्यासाठी दोन ते तीन सदस्य मंडळांकडून विनंत्या मिळाल्या, असल्याची माहिती त्यांनी दिली.
शाह यांनी स्पष्ट केले की क्रिकेट बोर्डाच्या या विनंत्या सामन्यांच्या तारखांशी संबंधित आहेत, ठिकाणाशी नाही. याआधी, अशी बातमी आली होती की नवरात्रीमुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अहमदाबादबाहेर हलवला जाऊ शकतो. शाह म्हणाले की, या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी मुख्य फोकस चाहत्यांना चांगला अनुभव देण्यासाठी स्टेडियमच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आहे. त्यामुळे सर्व राज्य मंडळांना वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्व तयारीनिशी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. BCCI सर्व स्टँडसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची योजना आखत आहे आणि Coke बरोबर भागीदारी केली आहे जी आयसीसी वर्ल्ड कप प्रायोजक देखील आहे.
दरम्यान, यावेळी जय शाह यांनी भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या पुनरागमनाविषयी महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. तो आयर्लंड दौऱ्यातून पुनरागमन करेल असे शाह यांनी सांगितले.