Join us  

जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? हार्दिकच्या एन्ट्रीमुळे नाट्यमय घडामोडी

IPL 2024 : आयपीएल २०२४ ला सुरूवात होण्यासाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 2:35 PM

Open in App

मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल... आयपीएल आणि प्रसिद्धी यांचे समीकरण वेगळेच आहे. आयपीएलची क्रेझ एवढी आहे की यापुढे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा देखील दबदबा कमी होतो. दोन महिने क्रिकेट विश्वाला आपलेसे करणारी ही बहुचर्चित लीग आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएल २०२४ ला सुरूवात होण्यासाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. यासाठी पुढील महिन्यात खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, या आधीच आयपीएलचा आगामी हंगाम चर्चेचा केंद्रबिंदू बनला. कारण गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने घरवापसी करत मुंबई इंडियन्सच्या संघात पुनरागमन केले. पण हार्दिकच्या एन्ट्रीमुळे अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. 

खरं तर हार्दिक पांड्या मुंबईचा पुढील कर्णधार असू शकतो अशा अफवा पसरत असताना जसप्रीत बुमराह नाराज असल्याचे देखील कळते. खुद्द बुमराहने इंस्टाग्रामवर एक स्टोरी ठेवून याचे संकेत दिले. अशातच बुमराहने मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला सोशल मीडियावर अनफॉलो देखील केले अन् अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. काही चाहत्यांनी तर बुमराह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात जाणार असल्याचा दावा केला. 

"कधीकधी शांत राहणं...", हार्दिकच्या येण्यानं मुंबईच्या ताफ्यात नाराजीनाट्य? बुमराहची पोस्ट चर्चेत

मुंबईचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराहने एक स्टोरी ठेवून चाहत्यांचे लक्ष वेधले. खरं तर रोहित शर्मानंतर जसप्रीत मुंबईचा कर्णधार होईल हे जवळपास स्पष्ट होते. पण, आता पांड्याची घरवापसी झाल्यानंतर बुमराहची अडचण झाली असल्याची चर्चा आहे. अशातच त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी ठेवून बोलकी प्रतिक्रिया दिली. लक्षणीय बाब म्हणजे एका वाक्यातच बुमराहने बरेचकाही सांगितले. "कधीकधी शांत राहणे हेच सर्वोत्तम उत्तर असते", असे बुमराहने म्हटले. 

दरम्यान, क्रिकेट वर्तुळात मागील दोन दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू असलेला हार्दिक पांड्या सोमवारी अधिकृतरित्या मुंबई इंडियन्सच्या संघाचा सदस्य झाला. पांड्याने आपल्या संघात घरवापसी केली असून आयपीएल २०२४ मध्ये तो मुंबईच्या ताफ्यात दिसणार आहे. हार्दिक पांड्याला त्याच्या घरच्या संघात जायचे होते, त्याचीच इच्छा असल्याकारणानेच त्याला मुंबईच्या संघात पाठवले गेले, असे गुजरातच्या फ्रँचायझीने स्पष्ट केले.  

 

टॅग्स :जसप्रित बुमराहहार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सगुजरात टायटन्सरोहित शर्मा