Join us  

बुमराहने गमावले अव्वल स्थान; आयसीसी क्रमवारीत रोहित, कोहली यांचीही झाली घसरण

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने एकदिवसीय क्रमवारीतले आपले अव्वल स्थान गमावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 9:08 AM

Open in App

दुबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने एकदिवसीय क्रमवारीतले आपले अव्वल स्थान गमावले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने अव्वल स्थानी झेप घेतल्याने बुमराहची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. फलंदाजी क्रमवारीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही फटका बसला असून, हार्दिक पांड्याने मात्र अष्टपैलू खेळाडूंमध्ये १३ स्थानांची झेप घेत अव्वल दहामध्ये स्थान मिळवले. भारताने काही दिवसांपूर्वीच इंग्लंडला २-१ असे नमवले. मात्र, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाठदुखीमुळे बुमराह खेळू शकला नव्हता. यामुळे त्याला आपले अव्वल स्थान गमवावे लागले. याचा फायदा घेत बोल्टने ७०४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. बुमराह त्याच्याहून केवळ एका गुणाने मागे आहे.

पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी ६८१ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. गोलंदाजांमध्ये अव्वल दहा स्थानी बुमराह हा एकमेव भारतीय आहे.  फलंदाजांमध्ये रोहित आणि कोहली या दोन्ही प्रमुख फलंदाजांना फटका बसला आहे. कोहलीची एका स्थानाने चौथ्या स्थानी घसरण झाली असून, रोहितही एका स्थानाने पाचव्या स्थानी घसरला आहे. बाबर आझम व इमाम-उल-हक या पाकिस्तानच्या फलंदाजांनी अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान कायम राखले आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात दमदार शतक झळकावलेल्या रस्सी वॅन डेर डुस्सेन याने तीन स्थानांनी प्रगती करत तिसरे स्थान पटकावले. या आठवड्यात कसोटी क्रमवारीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

टॅग्स :आयसीसीजसप्रित बुमराहरोहित शर्माविराट कोहली
Open in App