मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएलच्या १६ व्या पर्वात खेळणार नसल्याने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. याशिवाय तो ७ जूनपासून द ओव्हलवर रंगणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही दिसणार नाही.
ईएसपीएनक्रिक इन्फोने दिलेल्या वृत्तानुसार जखमी बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयकडून मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पाठीच्या जखमेमुळेच तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेबाहेर आहे. बुमराहच्या पाठीचे दुखणे बरे झालेले नाही. तो मागच्यावर्षी टी-२० विश्वचषकाआधीच संघाबाहेर झाला.
सप्टेंबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेनंतर तो क्रिकेट खेळलेला नाही. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तो पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी झाला. भारतात ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२३ ला आयोजित होणाऱ्या वन डे विश्वचषकात तो खेळू शकेल का, याविषयी शंका कायम आहे. बुमराहने ३० कसोटी, ७२ वन डे आणि ६० टी-२० सामने खेळले असून त्यात क्रमश: १२८, १२१ आणि ७० गडी बाद केले. जुलै २०२२ ला इंग्लंड दौऱ्यानंतर त्याला कंबरेच्या स्ट्रेस फ्रॅक्चरचा त्रास जाणवला. तेव्हापासून तो सतत संघाबाहेर आहे.